नवी दिल्ली/मुंबई - महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील जनता आक्रमक झाली अस

नवी दिल्ली/मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे वक्तव्य केल्यानंतर राज्यातील जनता आक्रमक झाली असून, काल शिवसेनेकडून वेळ पडल्यास मोर्चा किंवा महाराष्ट्र बंद करावा लागला तरी, चालेल पण राज्यपालांना परत पाठवण्याची वेळ आली असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर राज्यपाल बदलाचे वारे जोमाने वाहत असून, काल शुक्रवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिल्ली गाठली आहे.
या दिल्ली दौर्यात राज्यपालांची गच्छंती अटळ असल्याचे मानले जात आहे. कारण राज्यपालांनी गेल्या काही दिवसांपासून केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील भाजप अडचणीत येतांना दिसून येत आहे. त्यामुळे राज्यपाल हटावल्यास भाजपची प्रतिमा संवर्धन होईल, आणि भाजपला फायदा होईल. त्यामुळे राज्यपाल बदला अशीच भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार असल्याचे समजते. कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उभ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्याची धग दिल्लीपर्यंत पोहचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरवण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत शिवरायांची तुलना उपस्थित पाहुण्यांशी केली. ते म्हणाले, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले. यावरून वाद सुरू झाला.
उदयनराजे, संभाजीराजे यांनी केला संताप – छत्रपती संभाजीराजे यांच्यानंंंतर उदयनराजे यांनी देखील राज्यपाल कोश्यारीच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त केला. उदयनराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जुना झाला, हे वाक्य राज्यपालांच्या तोंडून ऐकून मी सुन्न झालो. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरीही होते. त्यांनी महापुरुषांच्या अपमानाबाबत आपल्या भाषणात भूमिका मांडणे आवश्यक होते. राज्यपालांना आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे म्हणणार्या सुधांशू त्रिवेदीला पदावरून हटवावे, या मागणीसाठी आपण पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.
COMMENTS