Homeताज्या बातम्यासंपादकीय

क्रिकेट च्या धुंदीत का गुंतलात ?

काल भारतातील सर्व शहरे किंवा महानगरांमध्येच नव्हे, तर, अगदी छोट्या-छोट्या खेड्यांमधील रस्ते देखील निर्मनुष्य झाले होते! याचं एकमेव कारण म्हणजे एक

महाराष्ट्राची ‘रूलिंग कास्ट’ आरक्षण याचक कशी बनली ? 
कोंबडे झाकून सुर्य रोखणारे राजकारणी!
निवडणूक धोरण आणि आयुक्त निवड ! 

काल भारतातील सर्व शहरे किंवा महानगरांमध्येच नव्हे, तर, अगदी छोट्या-छोट्या खेड्यांमधील रस्ते देखील निर्मनुष्य झाले होते! याचं एकमेव कारण म्हणजे एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषकातील अंतिम सामना! हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात होता. या सामन्याच्या दरम्यान प्रेक्षकांनी स्कोअर जाणून घेत असताना आपल्या देशातील मूळ समस्यांना पूर्णपणे विस्मरणात टाकले होते. क्रिकेट संघ हा आपल्या देशात कधीही राष्ट्रीय संघ राहिलेला नाही. तो एका खाजगी संघटनेचा संघ आहे. परंतु, जाहिरातीच्या बळावर तो खाजगी संघ हा राष्ट्रीय संघ म्हणून आपल्यासमोर उभा केला जातो. अर्थात, एक भारतीय म्हणून आपला कोणाचा त्यावर आक्षेप असण्याचं कारण नाही. परंतु जे क्रिकेटपटू खोऱ्याने पैसा कमावतात, आपली प्रचंड श्रीमंती केवळ ऐश करण्यामध्येच व्यतीत करतात, अशा या विश्वचषकातील खेळाडूंनी आणि विशेषत: त्यातील भारतीय खेळाडूंनी, अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी उत्तराखंडमध्ये कोसळलेल्या बोगद्यात अडकलेल्या मजूरांना वाचविण्यासाठी प्रार्थना केली असती तर, निश्चित बरे वाटले असते.भारतीय मजुरांची अजूनही सुटका झालेली नाही. त्यांच्यासाठी किमान एक वाक्य उच्चारले असते तरीही, या भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान राहिला असता. भारतातील भुकेल्यांची संख्या ही २८.२ टक्क्यांपर्यंत किंवा त्याहीपेक्षा अधिक वाढलेली आहे. जगातल्या १२५ देशांमध्ये भुकेचा जो निर्देशांक आहे, त्यामध्ये भारत १११ व्या क्रमांकावर आहे. ओबीसींची लोकसंख्या या देशांमध्ये ६०% च्या जवळपास आहे. परंतु, त्यांना दिले जाणारे आरक्षण हे निम्म्याने देखील नाही. केवळ २७% आरक्षण हे मंजूर करण्यात आले आहे.  त्यातही देशातल्या बड्या शेतकरी जाती, आपला हिस्सा मागण्यासाठी  स्वतःला ओबीसी घोषित करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत! महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. अनुसूचित जाती जमातीवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढले आहे! अशा या काळात या प्रश्नांचे स्कोअर देखील आपल्याला माहित हवेत. परंतु, पलायनवाद स्वीकारलेल्या आपल्या मनाला आपल्या देशाचे हे वास्तव चित्र नजरेसमोर आणावेसे वाटत नाही! पलायनातून सुख भोगण्याचा कारभार भारतीय लोकांच्या मनावर राज्य करत आहे. तो उतरण्याचे नाव घेत नाही. भारतीय समाजामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे; अनुसूचित जातींना १५ टक्के आरक्षण आहे तर, अनुसूचित जमातीला साडेसात टक्के आरक्षण आहे. अशा या आरक्षणधारी वर्गाला गेल्या ७५ वर्षात भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालेले नाही. आजही आपला भारतीय संघ हा उच्च जातीय खेळाडूंनी व्यापलेला आहे. खेळाचे कसब हे निश्चितपणे जातीव्यवस्थेच्या उतरंडीत सर्वात तळाला असलेल्या जातींमध्ये अधिक असू शकते. कारण, संघर्षातून त्यांची शारीरिक सक्षमता ही मोठ्या प्रमाणात विकसित झालेली असते. या वर्गातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या श्रमाच्या अनुभवातून एक तत्त्वज्ञान उलगडलेले असते. खेळाच्या या प्रक्रियेत आपलं कौशल्य कसं विकसित करावं, याची जाण कोणत्याही क्रिकेट समीक्षकापेक्षा त्याला अधिक असू शकते.  असा संघ जगातला कोणताही सामना सहजपणे जिंकण्याची क्षमता राखू शकतो. पण, असा राष्ट्रीय संघ या देशात कधी उभा राहिला नाही. शिवाय असा क्रिकेट संघ जो भारताच्या सार्वजनिक संस्थेचा भाग आहे किंवा सरकारच्या अधिनस्थ राहून तो निवडला जातो, असा जर क्रिकेट संघ असेल तर तो निश्चितपणे आम्ही राष्ट्रीय मानला पाहिजे. परंतु, केवळ नफ्या तोट्याचे गणित समजून बैल बाजारात प्राणी विकले जावे तसे हे खेळाडू अनेक स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये विकले जातात; ही संकल्पना माणूस म्हणून हेटाळणी करणारी आहे. तेव्हा अशा मानवी मूल्यांना समजून न घेणाऱ्या खेळाडूंच्या या संघाला आम्ही राष्ट्रीय संघ म्हणून त्यांच्या विजय – पराभवाचे दुःख हे आमच्या मनाशी-उराशी बाळगून घेतो! त्यातून आम्ही बाहेर पडलं पाहिजे. ऑलिंपिक मध्ये जाणारा भारतीय संघ हा राष्ट्रीय संघ असतो. कारण, त्यांची निवड शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होते. म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही खेळात जाणारा संघ हा राष्ट्रीय संघ असतो.  ऑलिंपिक सारख्या खेळांमध्ये जेव्हा खेळाडू सुवर्णपदक, रजतपदक,  कास्यपदक मिळवतात तेव्हा, एक भारतीय नागरिक म्हणून आम्हाला निश्चितपणे अभिमान वाटतो. पण जे खेळाडू केवळ खाजगी संस्थेचे खेळाडू आहेत, त्यांना राष्ट्रीय संघ समजून आम्ही भारतीय लोक निखालस चूक करीत आहोत. या खाजगी संघाच्या विजय-पराभवाशी आमचं, भारतीय म्हणून कोणतही दुःख किंवा आनंद जोडून घेण्याचे काही कारण नाही! अशा केवळ भांडवली विश्वावर आधारलेल्या, मानवी मूल्य नाकारणाऱ्या आणि माणसांसाठी कधीही शब्द न काढणाऱ्या अशा या क्षेत्रातील खेळाडूंच्या विजय – पराभवाच्या आनंद अथवा दुःख मानण्याचे कारण नाही!  उत्तराखंडच्या एका बोगद्यात भारतीय मजूर काही दिवसांपासून अडकले आहेत. जीवन-मरणाचा संघर्ष ते करीत असताना राष्ट्रीय पातळीवर त्यांचे जीवन वाचवण्यासाठी आमच्या मनामध्ये जराही शल्य निर्माण होत नाही! ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे. हे प्रथम आपण भारतीय म्हणून मान्य करायला हवं. काल कोणता संघ चांगला खेळला किंवा कोणता संघ वाईट खेळला किंवा कोणत्या संघाने काय बक्षीस मिळवलं, त्या बक्षिसांमध्ये भारतीय सामान्य माणसाला काय मिळालं, हा प्रश्न जेव्हा आम्ही विचारायला सुरुवात करू, तेव्हा, निश्चितपणे क्रिकेटची परिभाषा आम्हाला कळायला लागेल. त्यानंतर आम्हाला या भारतीय समाजाच्या स्किलचे महत्त्व कळायला लागेल एवढं मात्र निश्चित!

COMMENTS