Homeताज्या बातम्यासंपादकीय

राज ठाकरे यांच्या मनातील शिवाजी महाराज कोणते ? 

महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे राज्य आहे, यावर मनसेचे राज ठाकरे यांना सातत्याने आक्षेप आहे, असं त्यांच्या शरद पवार यांच्यावर केलेल्या

भारनियमनः सरकारची कसोटी
देशात एकाचवेळी निवडणूका म्हणजे मुळ भूमिकाच!
एका विषयाचे दोन सोबती !

महाराष्ट्र हे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे राज्य आहे, यावर मनसेचे राज ठाकरे यांना सातत्याने आक्षेप आहे, असं त्यांच्या शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेतून दिसते. शरद पवार हे फुले-शाहू-आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं म्हणतात; ते शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत, असे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा म्हटले. मात्र, महापुरूषांचे नाव घेताना अशाप्रकारे गोंधळ करायचा नसतो, हे साध्य तत्व गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकारणातूनही त्यांना लक्षात आलेले दिसत नाही. परिणामी, राजकीय अपयश त्यांच्या पदरी कायम आहे.

     राज ठाकरे यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांची ताकद यावरूनही कळायला हवी की, देशात मजबूत बहुमत प्राप्त केलेल्या भारतीय जनता पक्षाला देखील वरवर का असेना, परंतु या महामानवांचे नाव घ्यावेच लागते. किंबहूना, भाजप सरकार काळात या महामानवांच्या संदर्भात काही बाबी ठळकपणे अधोरेखित झाल्या. त्यातील महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील घर खरेदी, शाहू महाराज यांच्या वारसांना थेट राज्यसभेत खासदार म्हणून प्रवेश या बाबी राज ठाकरेंनी लक्षात घ्यायला हव्यात.

       छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी त्यांच्या पश्चात शंभूराजे यांनी बांधल्याचे ऐतिहासिक दाखले इतिहास संशोधकांनी दिले आहेत. मात्र, या समाधीची पेशव्यांच्या काळात दुर्दशा झाली होती. शिवाजी महाराजांच्या समाधीचा पहिल्यांदा शोध लावला तो महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी शिवाजीराजांना महाराजांना कुळवाडी भूषण रयतेचे राजे असे म्हटले आहे. 

    शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते आणि त्यांनी रयतेच्या कल्याणासाठी राज्य चालवले. राज्य चालवताना विचाराचे रूपांतर व्यवहारात करावे लागते. शिवाजी महाराज यांच्यावर संत चळवळ आणि त्या चळवळीचे समता तत्त्वांचा संस्कार माता जिजाऊ यांनी केला होता. त्यांनी चालवलेले समतेचे राज्य महात्मा यांनी अभ्यासले म्हणूनच ते महाराजांची समाधी शोधायला गेले. महात्मा फुले यांची वैचारिक चळवळ डॉ.‌बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे तळागाळापर्यंत आणली. याबरोबरच शाहू महाराजांनी १९०२ पासूनच समतेच्या तत्त्वाला व्यवहारात आणले. अशी ही विचार तत्त्वांची सांगड राज ठाकरे यांच्या लक्षात आलेली नाही किंबहूना तशी लक्षात घेणं हे त्यांचं उद्दिष्ट नाही.

       जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बघण्याचे दोन दृष्टिकोन महाराष्ट्रात आहेत. एक म्हणजे कुळवाडी भूषण रयतेचे राजे हा महात्मा फुले प्रणित दृष्टीकोन तर लोकमान्य टिळक प्रणित गोब्राह्मणप्रतिपालक हा दृष्टिकोन. यातील राज ठाकरे हे दुसऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार करित असल्याने त्यांच्या प्रतिक्रिया तशा येतात.

      याचवर्षी १ मे रोजी औरंगाबाद येथील सभेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी टिळकांनी बांधल्याची लोणकढी थाप वक्तव्य केले होते. यानंतर महाराष्ट्रातील अनेक इतिहास तज्ज्ञांनी त्यांच्या मताचा खरपूस समाचार घेतला होता. पण, राज ठाकरे यांच्यात बदल होताना दिसत नाही. त्यामुळे ते दुसऱ्या प्रस्थापित छावणीचं नेतृत्व करताना दिसतात.  बहुसंख्य जनतेचे मान्यता पावलेले मत हेच आहे की, छत्रपती शिवाजी महाराज कुळवाडी भूषण रयतेचे राजे होते. याच मताला शरद पवार पुष्टी देतात, समर्थन करतात म्हणून ते महाराष्ट्राच्या राजकारणात यशस्वी ठरलेले दिसतात. याउलट ही वस्तुस्थिती लक्षात न घेणारे राज ठाकरे हे राजकारणात सातत्याने अपयश पदरी पाडून घेताना दिसतात.

COMMENTS