मराठी माणसांच्या न्याय-हक्कांसाठी दिवंगत बाळासाहेब ठाकर यांनी शिवसेना या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. ज्वलंत हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना फोफावली, वाढ
मराठी माणसांच्या न्याय-हक्कांसाठी दिवंगत बाळासाहेब ठाकर यांनी शिवसेना या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. ज्वलंत हिंदुत्वाचा विचार घेऊन शिवसेना फोफावली, वाढली. मात्र आज शिवसेनेची अवस्था बिकट झाली आहे. 40 पेक्षा जास्त आमदारांनी बंड करत शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर सोमवारी शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्यासोबत 12 नव्हे तर 18 खासदार असल्याचा गौप्यस्फोट दिल्लीत केला. शिवाय लोकसभेत या 18 खासदारांची शिंदे गट म्हणून वेगळा गट नोंदण्याची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शिवसेनेची स्थापना होऊन 55 वर्षांचा कालावधी लोेटला असला, तरी शिवसेनेला स्वतंत्रपणे राज्यात सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपची साथ घेऊन शिवसेना सत्तेत आली, मात्र शिवसेनेची गंभीर अवस्था झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष दुरावतांना दिसून येत आहे, तर दुसरीकडे भाजप आधीच दुरावलेला आहे. अशा बिकट परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षाची पुर्नःबांधणी करावी लागणार आहे. कारण शिवसेनेतील 10-15 खासदार शिंदे गटासोबत जाणार, हे लपून राहिलेले नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेला फुटू न देणे हे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. बाळासाहेबानंतर शिवसेनेची सर्व सुत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती आली. मात्र त्यांना ज्येष्ठ आणि तरूण नेतृत्वाचा समन्वय साधता आला नाही. त्यामुळे शिवसेनेत अनेक ज्येष्ठ नेत्यांना सातत्याने डावलण्यात येत होते. तर आदित्य ठाकरे यांना पुढे आणले जात होते. त्यामुळे अनेक मंडळीचा उद्धव ठाकरेंवर राग होता. नारायण राणे तर उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. शिंदे गटाच्या एकाही आमदाराने किंवा खासदारांने आतापर्यंत उद्धव ठाकरेंवर टीकेची तोफ डागली नाही. मात्र शिवसेनेला आजच्या परिस्थितीला संजय राऊत असल्याचे वारंवार सांगून राऊतांनी कमी बोलण्याचा सल्ला दिला आहे. शिवसेनेमध्ये एक नेत्यांची फळी होती. ती फळी बाहेर पडली आहे, अन्यथा शिवसेना महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करू शकणारा पक्ष ठरला असता. नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे, यासारखी अनेक मातब्बर नेते शिवसेनेत होते. मात्र शिवसेना या नेत्यांना सांभाळण्यात अपयशी ठरली. शिवाय या नेत्यांची महत्वाकांक्षा होती. त्यामुळे त्यांच्या महत्वाकांक्षाना आवर घातल्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्यात पसंदी दिली. महत्वाकांक्षी माणूस जसा मोठा होतो, तसाच पक्ष देखील मोठा होतो. मात्र आपल्या माणसांना रसद पुरवणे उद्धव ठाकरेंना जमले नाही. मात्र आपल्याच माणसांची पंख छाटण्याचे काम केल्यामुळे आज 40 पेक्षा जास्त आमदार शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेनेचे विधानसभेवर 56 आमदार निवडून गेले. यापैकी एकाचा मृत्यू झाल्यामुळे उरलेल्या 55 आमदारांचा विधीमंडळ पक्ष झाला होता. पण एकनाथ शिंदे यांनी दोन तृतियांश आमदार स्वतःसोबत असल्याचा दावा केला. नंतर एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण याआधी शिवसेनेने एकनाथ शिंदे तसेच शिवसेनेच्या इतर 15 आमदारांना नोटीस बजावली. या 16 आमदारांचे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय उद्या येऊ घातला आहे. या निर्णयात शिवसेनेला दिलासा मिळतो की, पुन्हा धक्का मिळतो, त्याचे उत्तर उद्याच मिळणार आहे. त्यामुुळे उद्धव ठाकरे यांनी आतातरी पक्ष संघटन बांधणीवर भर द्यायचा आहे. शिवाय संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, कोणाच्या तक्रारी आहेत, त्या जाणून घेण्याची गरज आहे.
COMMENTS