Homeताज्या बातम्याधर्म

आरोग्यरूपी धनसंपदा-धनत्रयोदशी

समस्त समाजाच्या कल्याणाची मनोकामना करणारा निराशेचा अंधःकार दूर करून, आत्मविश्‍वासाचा प्रकाशदीप जागवणारा दीपोत्सव आजपासून सुरु झाला आहे. धनत्रयोदश

होळीचे दहन सोमवारी की मंगळवारी ?
पोलिसांनाही आता ‘वर्क फ्रॉम होम’ | LOKNews24
..तर, एकूण लोकशाहीचीच नव्याने चर्चा आरंभ करावी लागेल!

समस्त समाजाच्या कल्याणाची मनोकामना करणारा निराशेचा अंधःकार दूर करून, आत्मविश्‍वासाचा प्रकाशदीप जागवणारा दीपोत्सव आजपासून सुरु झाला आहे. धनत्रयोदशी म्हणजेच आश्‍विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीजेपर्यंतच्या पाच दिवसांत हा दीपोत्सव साजरा होतो, चैतन्याचे जागरण करणारा, आनंदाच्या भावनेबरोबर समाधानाचे आणि मनःशांतीचे दान देणारा हा सण देशभर सारख्याच उत्साहाने पार पडतो. धनत्रयोदशीला केली जाणारी धनसंपत्तीची पूजा आणि त्याचवेळी प्राचीन काळापासून चालत आलेली आणि आरोग्याचे महत्व सांगणार्‍या धन्वतरीं देवतेची पूजा केली जात असते. परंतु धनत्रयोदशीचा अधिकाधिक संबंध हा धन्वंतरी पूजनाशी जोडला गेला आहे. आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान दिलेल्या धन्वंतरीच्या आराधनेतून समाजाच्या आणि व्यक्तीच्या उत्तम आयुररोग्याचे आवाहन केले गेले. शरीर हेदेखील एका संपत्तीसारखे असते. आणि तितक्याच कटाक्षाने त्याची काळजी घेतली पाहिजे. अन्य संपत्तीप्रमाणे आरोग्याची किंवा शरीराची सुरक्षितता राखण्याचा एक संस्कार यानिमित्ताने बिंबवला गेला. फक्त यातला मोठा फरक असा की, शरीराच्या सुदृढतेतूनच मनाच्या संपन्नतेचा विचार या धन्वंतरीच्या पूजनातून मांडला गेला आहे. मनाची प्रसन्नता ही शरीराच्या सुदृढतेवर आणि शरीर सुदृढ असेल तर मनशांतीची अनुभूती असा हा सहधर्मी आरोग्य प्रवास आयुर्वेदातून सांगितला गेला.

केवळ भौतिक मुखाच्या मागे न धावता मानसिक सुखाचाही तितक्याच गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणि हे मानसिक सुख शरीराच्या सुदृढतेतून प्राप्त करता येऊ शकते. कदाचित एखादेवेळी इतर प्रकारची भौतिक सुखे मिळाली नाहीत तरी चालतील. शरीर उत्तम असेल तर बाकीच्या गोष्टी प्राप्त करता येऊ शकतात. कारण या शरीराचा थेट संबंध मनाशी असतो.. आणि हेच मन समाधानाचा आविष्कार घडवित असतात. धन्वंतरीच्या आराधनेतून प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा एका व्यापक विचाराची आणि संस्काराची देणगीच म्हटली पाहिजे. एकेकाळी तर मनुष्याला अमरत्वाचे दान मिळत असे. आज ते शक्य नाही. आणि म्हणूनच अनारोगाचे संकट सुदृढ आरोग्य प्राप्त करणे आवश्यक ठरते. आरोग्यालादेखील धनसंपदेची उपमा देऊन हाच विचार व्यापक रूपाने संक्रमित होत गेला आणि तो धनत्रयोदशीसारख्या सणाच्या निमित्ताने अधोरेखित होत राहिला. आज अनेक घरांमध्ये धन्वंतरी देवतेला धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवून आपल्या भावना व्यक्त केल्या जातात. धणे आणि गुळाचे मिश्रण शरीरासाठी पोषक असते. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आरोग्याची पर्यायाने मनाच्या संपन्नतेची काळजी घेण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केलेला दिसून येतो. कारण पुढच्या पाच दिवसांमध्ये अन्य धनसंपत्तीची लक्ष्मीची पूजा होते. भाऊबीजेच्या दिवशी कुटुंब, परिवार या गोष्टीदेखील कशा एका सामाजिक संपत्तीचा भाग असतो, हे गृहीत धरून तो सण साजरा होतो. आणि या पुढच्या चार-पाच दिवसांमध्ये शरीर आणि मन प्रसन्न, आनंदी राहावे, याकरिताच धनत्रयोदशीची रचना केली असावी. असे म्हटले ठरते चुकीचे ठरू नये. आजच्या यंत्र युगामध्ये सर्व प्रकारची सुख, संपत्ती पैशाच्या जोरावर मिळवण्याचा अहंकार मनुष्यामध्ये पाहायला मिळतो. परंतु ही सुख, संपत्ती मिळवल्यानंतर त्यापासून समाधानाचा अनुभव घेता आला पाहिजे. किंबहुना या संपत्तीचा विनियोग व्यक्ती, कुटुंब आणि समाज या तिघांकरिता सारख्या पद्धतीने झाला पाहिजे.

पण दुर्देवाने आज पैसा, घर, गाडी, बंगला याकरिता लोकांची अहोरात्र धावपळ सुरु असते. मन मारून शरीराकडे दुर्लक्ष करून संपत्ती मिळवण्याची ही स्पर्धा सतत सुरु असल्याचे दिसून येते. मात्र त्यातून गडगंज पैसा जमा होतो. संपत्तीचा हव्यासही काही प्रमाणात पूर्ण करता येतो. मात्र त्या संपत्तीचा उपयोग करताना जी मनःशांती लागते किंवा समाधानाची समृद्धता लागते ती पाहायला मिळत नाही. अस्वस्थता आणि सतत निराशेच्या गर्तेत वावरण्याची पाळी अनेकांवर येते. म्हणजे सर्व काही असून काहीच हाती न लागण्याचे नैराश्य अनेकांना वाटत असते. आणि त्यातून बाहेर कसे पडावे किंवा यावरचा नेमका उपाय काय याचाही शोध अनेक लोक घेतात. परंतु भारतीय संस्कृतीत विचारपूर्वक सुखाच्या मार्गाची किंवा त्याच्या अनुभवाची अभ्यासपूर्ण रचना पाहायला मिळते. त्याचेच एक उदाहरण म्हणजे दीपोत्सवासारख्या सर्वोच्च अशा सण उत्सवाच्या प्रारंभीच धनाचे, मनाचे आणि समाधानाचे महत्व बिंबवण्याचा केलेला प्रयत्न सांगता येईल.
ज्या वेळेला आपण अन्य धनसंपत्तीबरोबर आरोग्याची तुलना करतो किंवा शरीर संपदेचे महत्व बिबवतो. त्यावेळेला सहजपणाने साधल्या जाणार्‍या परिणामांकडेही लक्ष वेधले जाते. ते म्हणजे शरीराच्या या सुदृढतेतच मनोव्यापाराचा विचार केलेला दिसून येतो कारण शरीराच्या संपत्तीचा उपयोगदेखील चांगल्या संस्कारांसाठी किंवा चांगल्या कार्यासाठी केला जावा, हेच गृहीत धरलेले असते. ज्याप्रमाणे मिळालेल्या पैशाचा विनियोग हा कुटुंबाच्या अथवा समाजाच्या कल्याणाकरिता केला जावा असे म्हटले जाते. त्याप्रमाणे शरीर आणि मनरूपी धनाचा उपयोगदेखील उदात्त आणि उन्नत विचारांसाठी किंवा कार्यासाठी केला जावा हे अपेक्षित असते. म्हणूनच रोजच्या प्रार्थनेमध्येसुद्धा जे काही शुभ असेल ते कल्याणकारक मानले गेले आहे आणि कल्याणकारक जे जे असेल त्यात आरोग्यरूपी धनसंपदेचा समावेश होतो. आणि अशा चांगल्या आरोग्यातून आणि मनातून अनिष्ट किंवा दुष्ट वासना काढून टाकण्याचे आवाहन केले जाते. शतूबुद्धिविनाशाय दीपोज्योती नमोस्तुते या प्रार्थनेत आरोग्यम धनसंपदेचा तितक्याच सहजपणे अविर्भाव झालेला दिसून येतो. अकरा इंद्रिये आणि मनबुद्धीचा समावेश केल्यानंतर आकाराला येणार्‍या तेरा म्हणजे त्रयोदश वृत्तींचा विचार या धनत्रयोदशीच्या दिवशी केला गेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

COMMENTS