कोपरगाव : पुणतांबा या पौराणिक महत्त्व असलेल्या गावाला 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते. या तीर्थक्षेत्रास "ब" दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्

कोपरगाव : पुणतांबा या पौराणिक महत्त्व असलेल्या गावाला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. या तीर्थक्षेत्रास “ब” दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक होळकर घाटाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामविकासच्या माध्यमातून ५ कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार आहे, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि आता आमदार विवेक कोल्हे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे पुणतांबा तीर्थक्षेत्राचा विकास अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राजा यज्ञसेनची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पुणतांब्यातील कार्तिक स्वामी, बारा ज्योतिर्लिंग, याज्ञसेनी देवी, मुदगलेश्वर, विठ्ठल मंदिर, शैव पंथीय समाधी, चांगदेव महाराज मंदिर परिसर आणि परिसरातील ऐतिहासिक वेशींसह इतर जवळपास १७१ मंदिरांचे जतन-संवर्धन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. कोल्हे परिवाराने पुणतांब्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून सभापती राम शिंदे यांनी कार्तिक स्वामी मंदिरात दर्शन घेऊन होळकर घाटाची पाहणी केली व घाटाच्या दुरवस्थेबाबत तातडीने संबंधित विभागाला सूचना देण्याचे आदेश दिले.
यावेळी मंदिर दुरुस्ती सेवा समिती, बजरंग दलाचे स्वयंसेवक, गंगाधर चौधरी, मधुकर सातव, सुभाषराव वहाडणे, भारतराव वहाडणे, सुधाकर जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काशीच्या विकासाच्या धर्तीवर पुणतांब्याचा जीर्णोद्धार स्नेहलता कोल्हे यांनी पुणतांबा तीर्थक्षेत्राचे महत्त्व विशद करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या धर्तीवर काशीचा विकास केला, त्याच धर्तीवर येथील पुरातन वास्तूंचा जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार व कार्य नव्या पिढीसाठी जपण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभापती प्रा. राम शिंदे यांनी या मागणीकडे विशेष लक्ष द्यावे, असा आग्रह त्यांनी धरला.
“राजा यज्ञसेनची नगरी म्हणून पुणतांबा ओळखले जाते. ब्रिटिश गॅझेट १८८७ मधील नोंदीनुसार अहिल्यादेवी होळकर यांनी इ. स. १७६५ ते १७९५ दरम्यान पुणतांबा येथे घाट बांधला. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या या परिसरात बारा ज्योतिर्लिंग आहेत.” – सुशांत घोडके.

COMMENTS