Homeताज्या बातम्यासंपादकीय

पाणीटंचाईचे संकट

राज्यात यंदा पाणीटंचाईचे संकट गहिरे होतांना दिसून येत आहे. यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे, ऐन नोव्हेंबर महिन्यापासून अनेक जिल्ह्यात टँकरने पाणीपुर

वंचितांचा नायक  
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावरून वादंग
मुदतपूर्व चाळवाचाळव  

राज्यात यंदा पाणीटंचाईचे संकट गहिरे होतांना दिसून येत आहे. यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे, ऐन नोव्हेंबर महिन्यापासून अनेक जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. नव्या वर्षांत पाणीटंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण यंदा देशातील विविध राज्यांमध्ये तब्बल 27 टक्के पाऊसाची तूट नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा अन्नधान्यांची टंचाई देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातील छोटी आणि मोठ्या धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेतल्यास या धरणात केवळ 63 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. मराठवाड्यात पाणीटंचाईचे तीव्र संकट घोंघावतांना दिसून येत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठा केवळ 36 टक्केच उपलब्ध आहे. त्यामुळे या विभागातील जनतेने जगायचे कसे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. फेबु्रवारी किंवा मार्च महिन्यांपर्यंत हा पाणीसाठा पुरेल असा एकंदरित अंदाज आहे, मात्र एप्रिल आणि मे महिन्यात पाणीटंचाईचे तीव्र संकट या विभागाला अनुभवायला मिळू शकते. पाणीसाठा वेगाने कमी होत असल्यामुळे यंदा पाणीपुरवठ्याबाबतच्या उपाययोजना गंभीरपणे करण्याची गरज आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसू नयेत आहे. गेल्या वर्षींच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांतील जलसाठा हा 20 टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे दुर्मिक्ष जाणवणार असतांना देखील त्यावर उपाययोजना करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. आगामी काही दिवसांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे, त्यामुळे राज्यकर्ते आणि विरोधक देखील राजकीय रणनीती आखण्यासाठी मश्गुल असल्याचे दिसून येत आहे. मात्र पाणीटंचाईचे सावट दूर करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना राबवण्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा मराठवाडा आणि ग्रामीण भागातील जनतेला पाणीटंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणावर सहन कराव्या लागणार असल्याचे दिसून येत आहे. आजमितीस राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, पाणीटंचाईमुळे 389 टँकरने 961 वाड्यांना, तर 366 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. या आकडेवारीत दिवसागणिक भर पडत आहे. राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या धरणांमध्ये जलसाठा कमी होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यसरकारकडून अनेक महत्वांच्या उपाययोजना करण्याची खरी गरज आहे. पाणीटंचाईबरोबरच महागाई देखील भडकण्याची शक्यता आहे. कारण अपुर्‍या पावसामुळे यंदा धान्यांचे उत्पादन देखील रोडावल्याचे दिसून येत आहे. अपुर्‍या ऊसामुळे साखरेचे उत्पादन देखील घटण्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवण्यात आलेला आहे. यासोबतच डाळीचे उत्पादन देखील कमी झालेले आहे. यंदा तुरीच्या डाळीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे, त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यात याच किंमती आणखीनच वाढण्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  डाळी-भाजीपाला, धान्याच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे. यासोबतच नव्या वर्षांमध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे दिसून येत आहे. ऐन हिवाळ्यामध्ये पावसाचे दुर्मिक्ष जाणवतांना दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीटंचाईसोबत जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न देखील गंभीर निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण पाणीटंचाईमुळे यंदा चाराची निर्मिती अल्प प्रमाणात झालेली आहे. अशा परिस्थितीत जनावरांना कसे सांभाळायचे हा महत्वाचा प्रश्‍न आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी पाणी संकटावर उपाययोजना करण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील जुन्या विहीरीतील गाळ काढून, त्यांना स्वच्छ करण्याची गरज आहे. यासोबतच त्या-त्या गावांतील पाणीटंचाईवर कशी मात करता येईल, यावर आराखडा बनवून त्यादिशेने उपाययोजना आखण्याची गरज आहे. तरच पाणीटंचाईवर मात करता येईल, अन्यथा पाणीटंचाईचे दुर्मिक्षाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

COMMENTS