कोपरगाव : श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात प्रवरा अर्थात विखे कारखान्याकडून सातत्याने अडथळे निर्माण केले जात असून, न्यायालयीन तसेच आर

कोपरगाव : श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजात प्रवरा अर्थात विखे कारखान्याकडून सातत्याने अडथळे निर्माण केले जात असून, न्यायालयीन तसेच आर्थिक पातळीवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी केला आहे. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत गणेश कारखान्याची लढाई प्रत्येक स्तरावर लढत असल्याची माहिती त्यांनी दिली.
२०२४ मध्ये प्रवरा कारखान्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा अवमान याचिका दाखल करून गळीत हंगाम शुभारंभाच्या दिवशी संचालक मंडळाला नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, डिसेंबर २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने प्रवरा कारखान्याच्या दोन्ही याचिका फेटाळून लावत गणेश कारखान्याच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतरही आर्थिक व्यवस्थापन, कर्ज प्रक्रिया तसेच ऊस पळवापळवीच्या माध्यमातून गणेश कारखान्याला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरूच राहिले.
उच्च न्यायालयातील याचिका फेटाळल्यानंतर प्रवरा कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. २१ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत कोणताही बोजा निर्माण करू नये, असे निर्देश दिले. विशेष म्हणजे, २० एप्रिल रोजीच गणेश कारखान्याला बँकेकडून कर्ज मंजूर झाले होते, मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे मॉर्गेज लोनची पुढील प्रक्रिया थांबली. सध्या आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे मेंटेनन्स सुरू असून, या आर्थिक अडचणींमुळे निधी उभारणी आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये अडथळे येत आहेत. यामुळे हजारो सभासद शेतकरी व कामगारांच्या हितास बाधा निर्माण होत असली, तरी श्री गणेश संचालक मंडळ याविरुद्ध सर्वतोपरी लढत असल्याचे अध्यक्ष सुधीर लहारे यांनी स्पष्ट केले.

COMMENTS