नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना

नवी दिल्ली : जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने भारतातील तेल शुद्धीकरण कंपन्यांना रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष परवानगी दिली आहे. ही मुभा 3 एप्रिलपर्यंत लागू राहणार असल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये तातडीने वाढ होण्याची शक्यता कमी झाली आहे.
अमेरिकेच्या अर्थ विभागाने हा तात्पुरता परवाना जाहीर केला असून, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी सांगितले की, भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून जागतिक बाजारातील तेलपुरवठा स्थिर राहावा, यासाठी ही सवलत देण्यात आली आहे. या परवान्याच्या अटींनुसार 5 मार्चपर्यंत जहाजांवर चढवण्यात आलेल्या रशियन कच्च्या तेलाचीच खरेदी आणि वितरण करता येणार आहे. त्यामुळे सध्या समुद्रात असलेल्या तेलवाहू जहाजांमधील सुमारे 95 लाख बॅरल कच्चे तेल भारतासह आशियाई देशांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही जहाजे आशियाई समुद्री क्षेत्राजवळ थांबून असल्याचेही दिसून येत आहे. मध्यपूर्वेत वाढलेल्या संघर्षामुळे जागतिक तेलबाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण-इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या तेलस्थळांवर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जगातील मोठ्या प्रमाणातील तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 84 डॉलरच्या आसपास पोहोचल्या आहेत. भारत हा जगातील तिसर्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा ग्राहक आहे. देशाच्या एकूण गरजेपैकी सुमारे 88 टक्के तेल आयात करावे लागते. स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने भारताने गेल्या काही वर्षांत रशियन तेल खरेदी वाढवली आहे. रशियाकडून मिळणारे तेल आंतरराष्ट्रीय मानक किमतीपेक्षा कमी दरात उपलब्ध असल्याने देशाच्या ऊर्जा खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. काही काळ निर्बंध आणि आंतरराष्ट्रीय दबावामुळे भारताची रशियन तेल आयात कमी झाली होती. मात्र अलीकडच्या महिन्यांत ती पुन्हा वाढली असून एकूण आयातीत त्याचा लक्षणीय वाटा आहे.

COMMENTS