. त्याशिवाय शिवसेना वरचढ ठरणार नाही !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

. त्याशिवाय शिवसेना वरचढ ठरणार नाही !

   महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या विरोधात कारवाई करून भाजप आणि शिवसेना संघर्ष अधिक तीव्रतम

दीपिका पादुकोणचे नव्या व्यवसायात पदार्पण
मनपा प्रशासनाकडून महाविकास सत्तेवर बॉम्ब?
भास्करराव पाटील खतगावकर यांची काँग्रेस प्रवेशाची घोषणा

   महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळच्या नातेवाईकांच्या विरोधात कारवाई करून भाजप आणि शिवसेना संघर्ष अधिक तीव्रतम होताना दिसतो आहे. या संघर्षात आधीच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्याविषयी भूमिका मांडतांना, आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे नाही, असे वक्तव्य केले होते. काल त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पुनरुच्चार केला. मात्र, हा पुनरुच्चार आणि त्याविरुद्ध ब्राह्मण सभेने आक्रमक पाऊल उचलत विनायक राऊत यांनी माफी मागितली नाही तर आपण मातोश्रीवर मोर्चा नेऊ, असा थेट इशारा दिला. शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात ही आक्रमकता खास करून जर आपण पाहिली तर तिथीनुसारच्या शिवजयंतीनंतर लगेचच ही कारवाई होताना दिसते आहे. याचा अर्थ भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता केवळ राजकीय म्हणून दिसत नाही, तर त्याला काही सांस्कृतिक अंग ही आता दिसायला लागले आहे. शिवसेनेच्या विरोधात बोलताना ब्राह्मण सभेने जो इशारा दिला त्यात त्यांनी हे देखील म्हटले आहे की हिंदुत्वाच्या विषयी बोलताना शिवसेनेला शेंडी – जाणव्याचे हिंदुत्व चालत नाही, मात्र मतांसाठी शेंडी जानवे कसे चालते, असा प्रश्न ब्राह्मण सभेने थेट विचारला आहे. परंतु वस्तुस्थिती आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचे आक्रमण म्हणून शिवसेनेची भूमिका ही उघड राहिली आणि त्यांनी हिंदुत्वाच्या भोवती संघटन निर्माण करून राज्यातील बहुजन समाजाला एकत्रित करून त्यांना हिंदुत्वाच्या छत्रछायेखाली एकत्र आणले. हिंदुत्वाच्या नावावर उभा राहिलेला हा समुदाय पाहूनच भारतीय जनता पक्षाला शिवसेनेबरोबर राजकीय युती करण्याचे सुचले आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेना ही राजकीय युती महाराष्ट्रात अवतरली. या युतीतून महाराष्ट्र राज्यात हिंदुत्वाचे ग्रामीण भागापर्यंत लोन पसरले. त्यात महत्त्वपूर्ण भूमिका ही शिवसेनेची राहिलेली आहे, हे महाराष्ट्राने पाहिलेले आहे. जवळपास पंचवीस वर्ष अबाधित राहणारी ही युती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याची सत्ताघडी बसवताना मात्र अचानकपणे तुटली. यातून या दोन्ही पक्षांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या एकूणच राजकीय सूत्रानुसार ठरलेल्या पद्धतीप्रमाणे ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री या धोरणानुसार भाजपाचे मुख्यमंत्री पद आणि सत्तेतला वाटाही गेला! त्यामुळे  येथून कदाचित भाजपा-सेना यांच्यातील राजकीय संघर्षाची सुरुवात झाली असावी, परंतु तो इतका तीव्र नव्हता जेवढा तो आता सांस्कृतिक मतभेदातून अधिक प्रकट होतो आहे! भाजप ही राजकीय आघाडी असली तरीही सेनेविरूद्ध त्यांचा संघर्ष हा आता केवळ राजकीय राहिलेला नाही, तर तो सांस्कृतिक पातळीवर उतरला असल्यामुळे हा संघर्ष तीव्र होताना दिसेल किंवा दिसतो आहे. सांस्कृतिक संघर्ष यासाठी दिसतो आहे की आजपर्यंत संघ प्रणित संघटनांना या देशामध्ये एकूणच समाजाला अंधश्रद्ध करणाऱ्या गोष्टींना वाव देण्यात अधिक रस आहे;  मात्र त्याची सुरुवात ही शिवजयंतीच्या निमित्ताने होईल असे वाटले नव्हते. शिवसेना ही सत्तेत आल्यानंतरही सुरुवातीला तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी आग्रही होती. मात्र सत्तेच्या वाटचालीत सेनेने बाजू बदलली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता १९ फेब्रुवारीला शासकीय नियमाप्रमाणे साजरी करायचे ठरवले आणि नुकत्याच तिथीप्रमाणे झालेल्या शिवजयंती मध्ये शिवसेना न उतरल्याने शिवजयंतीला भव्य स्वरूप न आल्याने भाजपात बेचैनी आली. त्याचे यथावकाश परिणाम भाजप-सेना संघर्ष अधिक तीव्र होण्यात दिसून येत आहे! अर्थात, यात केवळ राजकीय पातळीवरून शिवसेनेने उत्तर द्यायचे म्हणजे लढा द्यायचे ठरवले तर ते फारसे टिकाव धरणार नाही! त्यामुळे, शिवसेनेला बहुजन समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाच्या पध्दतीने लढा द्यावा लागेल. त्याशिवाय, या लढ्यात शिवसेना वरचढ ठरू शकणार नाही!

COMMENTS