बीड : लोकसभा निवडणुकांच्या निकालात यंदा अनेक धक्कादायक आकडे पाहायला मिळाले असून देशात इंडिया आघाडीला व राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आह
बीड : लोकसभा निवडणुकांच्या निकालात यंदा अनेक धक्कादायक आकडे पाहायला मिळाले असून देशात इंडिया आघाडीला व राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. राज्यातील हाय व्होल्टेज लढतींपैकी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला असून सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर, राज्यात सर्वात हाय व्होल्टेज आणि जातीय रंग लागल्याने चर्चेत ठरलेली लढत बीड लोकसभा मतदारसंघात झाली. बीड, परभणी, जालना मतदारसंघात मराठा आरक्षणाचा व मनोज जरांगे फॅक्टर जाणवल्याचं दिसून आलं. बीडमध्ये पहिल्या फेरीपासूनच अत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामध्ये, पहिल्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी 1359 मतांचे मताधिक्य घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर, तिसर्या फेरीतही सोनवणे आघाडीवर होते. मात्र, बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.
मराठा आरक्षण, मनोज जरांगे फॅक्टर, राष्ट्रवादीतील फूट या कारणांमुळे चर्चेत व लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात क्रिकेट सामन्यातील शेवटच्या षटकांपर्यंत व्हावी अशी चूरस दिसून आली. शेवटच्या षटकात सामना बरोबरीत सुटावा आणि सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाला लागावा अशीच परिस्थिती बीडमधील लोकसभेच्या निवडणूक निकालात दिसून आली. पहिल्या फेरीपासून पुढील काही फेरीपर्यंत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, 5 ते 10 हजारांच्या फरकावर सुरू असलेल्या फेर्यामुळे येथील मतदारसंघात अत्यंत चुरस निर्माण झाली होती. उमेदवारांची धाकधूक आणि कार्यकर्त्यांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली, ती शेवटच्या 32 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. पंकजा मुंडेंनी बजरंग सोनवणेंची आघाडी तोडून तब्बल 43 हजारांची आघाडी घेतली होती. मात्र, 31 व्या फेरीत पुन्हा पंकजा मुंडेंचा लीड कमी होऊन बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतली. पंकजा मुडेंचा लीड कमी होऊन शेवटच्या काही फेरीत हे मताधिक्य केवळ 400 मतांवर येऊन पोहोचलं होतं. त्यामुळे, राज्यात सर्वात थरारक आणि उमेदवारांच्या काळजाचे ठोके चुकवणारी ही लढत ठरली आहे. 31 व्या फेरीत बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतल्यामुळे शेवटच्या म्हणजेच 32 व्या मतमोजणीकडे सर्वांचे लागले होते. 31 व्या फेरीअखेर बजरंग सोनवणे 688 मतांनी आघाडीवर पोहोचले होते. त्यामुळे, 32 व्या फेरीत नेमकं काय होईल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. बजरंग सोनवणे यांना 31 व्या फेरीअखेर 6 लाख 74 हजार 507 मतं मिळाली आहेत. तर, पंकजा यांना 6 लाख 73 हजार 819 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची धाकधूक सर्वांना लागली होती. पंकजा मुंडेंनी 31 व्या फेरीनंतर माध्यमांशी बोलताना माझे मताधिक्य 40 हजारांहून कमी कमी होत 400 पर्यंत आल्याचं म्हटलं. तसेच, पुढच्या अंतिम फेरीत काय होईल हेही मला माहिती नाही, असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
COMMENTS