फडणवीसांच्या मुत्सद्दीच्या एका दगडात तीन सावज!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

फडणवीसांच्या मुत्सद्दीच्या एका दगडात तीन सावज!

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल धक्कादायक असाच म्हणावा लागेल. या धक्कादायक निकालाचे सर्वस्वी श्रेय राज्याचे विरोधी

महाराष्ट्राची ‘रूलिंग कास्ट’ आरक्षण याचक कशी बनली ? 
उसापासून इथेनॉल बनवण्यावर बंदी
शिवसेनेच्या 40 आमदारांना दोन आठवड्यांची मुदत

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणूकीचा निकाल धक्कादायक असाच म्हणावा लागेल. या धक्कादायक निकालाचे सर्वस्वी श्रेय राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, असे म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. राज्यसभा निवडणूकीत एकूण १२३ आमदारांची मते घेणाऱ्या भाजपने विधानपरिषदेच्या निवडणुकीत तब्बल १३४ मतांपर्यंत मजल मारली. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी सर्वप्रकारची काळजी घेऊनही मतांची फुटीरता रोखण्यात यश आले नाही! याउलट फडणवीस यांनी एक जादाचा उमेदवार देऊन निवडणूक घेण्यास बाध्य केले. त्यांचा हा कमालीचा आत्मविश्वास निश्चित मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकीय नेत्याचे गुण दर्शविणारा आहे. विधानपरिषदेचे निकाल लागतात न लागतात तोच सेनेचे जेष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा एक गट घेऊन थेट सुरत गाठले. देवेंद्र फडणवीस यांचा मुत्सदीपणा, एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शरद पवार यांचा चाणाक्षपणा या बाबी या क्षणाला अतिशय महत्वाच्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना एक परिपक्व राजकीय नेता म्हणून एक गोष्ट निश्चित कळते की, ‘लोहा गरम है, मार दो हातोडा!’ खरेतर विधानपरिषद निवडणुकीत आमदारांची मते फुटणार हा विश्वास फडणवीस यांना असणं आणि एकनाथ शिंदे यांना हे आमदार का फुटणार याची जी कारणमीमांसा माहीत असेल त्याचा हा संयुक्तिक परिणाम आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता जवळपास तीन वर्षाचा कालावधी मुख्यमंत्री म्हणून पूर्ण होतोय; तरीही, राज्यात कोणत्याही महामंडळाच्या नियुक्त्या नाहीत. भाजप-सेना यांच्या युतीच्या काळात नेमली गेलेली महामंडळ अजून तशीच आहेत. याचाच अर्थ भाजप आणि सेना यांच्याच ताब्यात अजूनही महामंडळे आहेत. याविषयी अपक्ष आणि सेनेच्या आमदारांमध्ये नाराजी वाढीस लागलीच होती. त्याचवेळी महाविकास आघाडीचे मार्गदर्शक म्हणून प्रत्यक्ष सरकारचे नियंत्रक असलेले शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांच्या मनाचा बराचसा ताबा घेतला असल्याचीही भावना सेना आणि महाविकास आघाडीसोबत असलेल्या आमदारांमध्ये वाढीस लागली आहे. त्याचाही बराचसा परिणाम विधानपरिषद निवडणुकीत आमदार फुटीत झाल्याचे दिसून येते. अर्थात, राष्ट्रवादी काँग्रेस, काॅंग्रेस आणि एकनाथ शिंदे यांचा सेना गट यांचे राजकारण मराठा प्राबल्याला गोंजारणारे असल्याचे दिसते. परंतु, एक मराठेतर नेता म्हणून फडणवीस या सगळ्यांना राजकारणाच्या मुत्सद्दी आखाड्यात जड पडतात, हे लागोपाठच्या तिन्ही घटनांमध्ये दिसते. या तिन्ही घटना म्हणजे राज्यसभा, विधानपरिषद निवडणूका आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी. मराठा समाजाच्या प्रश्नावर आपल्यालाच सेनेत नेतृत्व असावं, हा शिंदे यांचा विचार बंडखोरीत रूपांतर होऊन उद्वस्त झालाय. अर्थात, देवेंद्र फडणवीस यांची राजकीय परिपक्वता इतकी वाढली की, त्यांना सरकार पाडण्यात आता रस राहिला नाही. कारण उर्वरित दोन वर्षांनंतर आपल्या कामगिरीने कोसळणाऱ्या सरकारला आता पदच्युत करून त्यांची सहानुभूती वाढवायची नाही, हा राजकीय सेन्स फडणवीस यांना पुरता कळतोय, असे म्हणावे लागेल. महाविकास आघाडी सरकार ज्या पद्धतीने वाटचाल करीत आहे, त्यातून केवळ आमदारांचीच नव्हे तर जनतेचीही नाराजी वाढीस लागली आहे. त्यामुळे, उरलेली दोन वर्षे विरोधी पक्ष म्हणून सत्ताधारी आघाडीला जेरीस आणणे एवढाच अजेंडा त्यांनी सध्यातरी ठेवलेला दिसतो. फडणवीस यांनी वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्या मराठा समाजाला क्रांती मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरायला भाग पाडून दोन गोष्टी सिद्ध केल्या होत्या; त्यातील पहिली म्हणजे, मराठा नेते दीर्घकाळ सत्तेत असूनही मराठा समाजाचा विकास घडवू शकले नाहीत, हे निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे मराठा बहुल सत्तेचा काळ आता इतिहासजमा झालाय, ही दुसरी बाब. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या चर्चेत काॅंग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना मराठा राजकारणामुळे पराभवाला सामोरे जावे लागले आहे, याची चर्चाच झालेली नाही.‌ चंद्रकांत हंडोरे हे क्रियाशील नेते असतानाही त्यांना घरी बसवण्यात महाविकास आघाडी चे मराठा प्राबल्याचे राजकारणच कारणीभूत असल्याची चर्चा अजून व्हायची आहे. तूर्तास एवढे पुरेसे!

COMMENTS