मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या "मिसिंग लिंक" परिसरात भीषण अपघात घडून तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जख

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या “मिसिंग लिंक” परिसरात भीषण अपघात घडून तिघांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगातील प्रवासी बसने समोरील तीन खाजगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बसने पुढील वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की काही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी वाहनांमध्ये अडकून पडल्याने बचावकार्याला मोठे आव्हान निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा पथक आणि मदतकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
गॅस कटरच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही मार्गिका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली.
दरम्यान, या मार्गावरील सलग अपघातांच्या घटनांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वेग मर्यादेचे पालन, चालकांची दक्षता आणि रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS