Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळामवाडी येथे तीन घरे आगीत जळून खाक; अंदाजे 15 लाखाचे नुकसान

शिराळा / प्रतिनिधी : काळामवाडी, ता. शिराळा येथील ज्ञानदेव रामचंद्र चिंचवाडकर, शामराव रामचंद्र चिंचवाडकर व आबासो ज्ञानदेव चिंचवाडकर यांच्या राहत्य

सुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा
घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयितास अटक
औंधला नळपाणी पुरवठा योजनेसाठी 16 कोटी निधी मंजूर ; श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची माहिती

शिराळा / प्रतिनिधी : काळामवाडी, ता. शिराळा येथील ज्ञानदेव रामचंद्र चिंचवाडकर, शामराव रामचंद्र चिंचवाडकर व आबासो ज्ञानदेव चिंचवाडकर यांच्या राहत्या घराला शुक्रवारी दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान अचानक आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी, आगीत धान्य, कपडे, अंथरुण, पांघरुण, रोख रक्कम, फर्निचर, सोने-चांदी, तीन मोटरसायकल, पिठाची गिरणी, इंजिन, शेती अवजारे, बैलगाडी असे सर्व मिळून अंदाजे 15 लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. ज्ञानदेव रामचंद्र चिंचवाडकर या कुंटुबाचे 11 खण चौघईचे कौलारु घर आहे. दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान संजय यांच्या गिरण व मोटरसायकल गॅरेज असणार्‍या ठिकाणी अचानक आग लागली. एकच घर असल्याने व वार्‍याचा वेग जास्त असल्याने आग सर्वत्र पसरली. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून जनावरांना बाहेर काढले. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. चिंचवाडकर कुटुंबियांची वापरातील कपडे व इतर साहित्य माडीवर असल्याने ते बाहेर काढता आले नाही. आग विजवण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी धाव घेत गावातील नळ पाणी पुरवठा योजना सुरू करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतू वार्‍याचा वेग जास्त असल्याने आग आटोक्यात येत नव्हती.
त्यामुळे किनरेवाडी येथून पाण्याचा टँकर आणला. तरीही पाणी कमी पडू लागल्याने निनाई कारखान्याने त्यांच्याकडील पाण्याचा टँकर पाठवला. त्यावेळी आग आटोक्यात आली. पण तोपर्यंत होत्याचे नव्हत झाले. सर्व साहित्य जळून खाक झाले होते. घटनास्थळी भूषण नाईक, माजी पंचायत समिती सभापती हणमंतराव पाटील यांनी भेट दिली. आग आटोक्यात आणण्यासाठी सरपंच राकेश सुतार, माजी सरपंच सदाशिव नावडे, पोलीस पाटील आकाराम पाटील, संतोष पाटील, आकाश पाटील व ग्रामस्थांनी प्रयत्न केले. घटनेचा पंचनामा तलाठी पाटसुते व सरपंच राकेश सुतार यांनी केला.

COMMENTS