कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, संजयनगर, हनुमाननगर, आयेशा कॉलनी या भागातील तीन लहान मुलांना मोकाट कुत्र्य

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, संजयनगर, हनुमाननगर, आयेशा कॉलनी या भागातील तीन लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केले. यापूर्वीही अनेक भागातील नागरिक मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात व मोकाट फिरणार्या जनावरांचा बंदोबस्त करण्यात नगर परिषद प्रशासन साफ अपयशी ठरले आहे. मात्र, नागरिकांकडून सक्तीने करवसुली केली जात आहे. नगर परिषद प्रशासनाने आधी नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तोपर्यंत करवसुलीची गाडी शहरात फिरू देऊ नये. प्रशासनाने नागरिकांच्या जीविताशी खेळू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा सज्जड इशारा भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या पदाधिकार्यांनी व नागरिकांनी दिला आहे.
संजयनगर भागातील तीन लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याचे समजताच भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या पदाधिकार्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना भेटून नगर परिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावरून त्यांना धारेवर धरले. यावेळी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष आरिफभाई कुरेशी, माजी नगरसेवक नयनकुमार ऊर्फ बबलू वाणी, विनोद राक्षे, दिनेश कांबळे, मेहमूदभाई सय्यद, वैभव गिरमे, राजेंद्र लोखंडे, पिंकी चोपडा, अल्ताफभाई कुरेशी, खालिकभाई कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, एस. पी. पठाण, अल्ताफभाई पठाण, रोहित कनगरे, अजितभाई तांबोळी, इम्रान हुसेन तांबोळी, तौसिफ तांबोळी, जुनेद तांबोळी, फिरोज अत्तार आदींसह भाजप, शिवसेना, आरपीआयचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जानेवारी महिन्यात न.प.मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांना भेटून शहरातील पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व इतर प्रश्न मांडले होते. तीन दिवसांपूर्वी आम्ही पुन्हा एकदा त्यांना नागरिकांचे हे प्रश्न सोडविण्याची विनंती केली होती; पण त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही.
नगरपालिका प्रशासनाने उपचाराचा खर्च करावा ः पराग संधान
15 मार्च सकाळी मोकाट कुत्र्यांनी हमजा जावेद अत्तार (वय 3 वर्षे, रा. आयेशा कॉलनी), हसनीन इम्रान तांबोळी (वय 6 वर्षे, रा. संजयनगर) आणि फैजल मोहसीन शेख (वय 4 वर्षे, रा. हनुमाननगर) या तीन लहान मुलांना चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे. या मुलांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या मुलांच्या उपचारासाठी मोठा खर्च येणार असून, त्यांचे पालक मोलमजुरी करून आपले घरदार चालवतात. त्यांना हा खर्च परवडणारा नाही. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्याकडे नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच आज तीन लहान मुले मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी झालेल्या लहान मुलांच्या उपचाराचा खर्च करण्याची त्यांच्या पालकांची ऐपत नाही. त्यामुळे या मुलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च नगरपालिका प्रशासनाने अधिकार्यांच्या पगारातून किंवा ठेकेदाराकडून करावा, अशी मागणी पराग संधान यांनी केली.
COMMENTS