विचाराचं कृतिशील रसायन

Homeताज्या बातम्यासंपादकीय

विचाराचं कृतिशील रसायन

ओबीसी नेते दिवंगत हनुमंत उपरे काका अर्धांकृती पुतळ्याचे नुकतेच बीडमध्ये अनावरण झाले. त्यांच्या कार्यावर नजर टाकणे त्यादिवशी क्रमप्राप्त होते. मात्र त

काँगे्रस आणि काही प्रश्‍न …
तालिबान्याचा उठाव आणि काबूलचा पाडाव
सर्वसामान्यांना दिलासा !

ओबीसी नेते दिवंगत हनुमंत उपरे काका अर्धांकृती पुतळ्याचे नुकतेच बीडमध्ये अनावरण झाले. त्यांच्या कार्यावर नजर टाकणे त्यादिवशी क्रमप्राप्त होते. मात्र ते त्यादिवशी शक्य झाले नाही. त्यामुळे आज त्यांच्या वाटचालीवर भाष्य करणे अगत्याचे.
 बुद्ध धम्माच्या वाटेवर’ हे उपरे काकांचं अभियान ओबीसी उद्धाराचा एक प्रशस्त मार्ग आहे. याला त्यांनी महत्त्व दिलेच परंतु दुसर्‍या बाजूला ओबीसींचे जे जीवघेणे प्रश्न आहेत ते चव्हाट्यावर त्यांनी मांडले. हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रबोधनाची लढाई, रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई सारखे लोकशाहीतील आयुधे त्यांनी वापरली. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, यासाठी आझाद मैदान गरम करणारे उपरे काका, बीडला रेल्वे आली पाहिजे यासाठी परळीला जाऊन दोन वेळा रेल्वे रोको करणारे उपरे काका, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि स्वतंत्र बजेट मिळाले पाहिजे अशी प्रसारमाध्यमांद्वारे मागणी करणारे उपरे काका, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यासाठी आक्रमक पवित्रा घेणारे उपरे काका आणि तमाम बहुजनांना ओबीसींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी बहुजन मेळावे, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय प्रबोधन वर्ग, ओबीसी साहित्य संमेलने, विद्रोही तसेच बामसेफ सारख्या अनेक विचारपीठांची निर्मिती करुन आणि त्याचा उपयोग करणारे उपरे काका, एवढेच नव्हे तर अनेक पुस्तकांचे लेखन करणारे उपरे काकांच्या मनात ओबीसी बद्दल खूप तळमळ होती हे मी जवळून पाहिले आहे.
ओबीसी या शब्दाचा अर्थ ते ‘ओरिजनल भारतीय कम्युनिटी’ असे सांगून तमाम बहुजनांना चळवळीत येण्यासाठी ते आवाहन करत असत. ओबीसींच्या आरक्षणाला कोणी धक्का लावत असेल तर प्रशासनाला जाब विचारणारे आणि प्रसंगी न्यायालयात ओबीसींची बाजू मांडणारे अत्यंत अभ्यासू नेतृत्व म्हणजे उपरे काका होते. ओबीसी बद्दलचे जी.आर., त्यांचे परिणाम हे अनेकदा महापुरुषांच्या जयंती तसेच स्मृतिदिनानिमित्त ते मांडत असत. ओबीसींच्या परिवर्तनासाठी आव्हानात्मक मुद्दे ते अत्यंत धाडसाने मांडणारे नेते होते. उदाहरणार्थ असीम त्रिवेदी या चित्रकाराने संविधानातील बोधचिन्हांचे रेखाटन अत्यंत वाईट पध्दतीने केले होते त्या असीम त्रिवेदी विरूध्द बीडच्या ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला आणि मुंबईहून त्या असीम त्रिवेदीला कोर्टात हजेरी लावून माफी मागावी लागली या प्रकरणाचा मी एक साक्षीदार आहे.
देशातील अनेक मंदिरांमध्ये प्रचंड संपत्ती असल्याचा वारंवार उल्लेख ते करत असत. स्वीस बँकेतील पैसा कोणतेच सरकार आणू शकत नाही कारण त्यात त्यांचे पैसे आहेत. अगोदर मंदिरातील संपत्ती बाहेर काढा ना! अशी आक्रमकता आता कोणत्या नेत्या जवळ आहे का? भारतीय प्रशासन सेवेत कोणत्या वर्गाचे किती प्रमाण आहे हे ते सांगत असत. ओबीसींना कमंडल मुळे मंडल कळाला नाही आणि धर्मग्रंथामुळे संविधान कळाले नाही असा फटका ओबीसींना ते मारत असत. अज्ञान, धर्मभोळेपणा, ग्रंथ प्रामाण्यवाद हेच ओबीसींचे शत्रू आहेत. या शत्रूंना तथागत गौतम बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायांनी पळवून लावले आहे, शत्रूंनी आता ओबीसीमध्ये आश्रय घेतला आहे असा गहन मुद्दा ते सर्वांना सांगत असत.
साहित्य संमेलनाची सातत्यता टिकली पाहिजे. साहित्य संमेलन तसेच दलित, आदिवासी चळवळ आपल्या मार्गदर्शक आहेत. बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले मार्गदर्शक नेते आहेत त्यांना समजून घेतले पाहिजे असे पोटतिडकीने आणि आक्रमकतेने उपरे काका सांगत असत.
 डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या होणे या देशातील धर्मांध शक्ती चा उन्माद आहे असे ते सातत्याने सांगत असत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना त्वरित अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी दिली पाहिजे या मागण्यांसाठी बीड  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या कार्यकर्त्यांसह ते धरणे आंदोलनासाठी बसले होते. बीड जिल्ह्यातील हा त्यांचा शेवटचा सार्वजनिक कार्यक्रम होता.
इ.स. सन 2008 मध्ये उपरे काकांनी सत्यशोधक ओबीसी परिषद या नावाने राज्यस्तरीय संघटना नोंदणीकृत केली. आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी गती आली. विधायक आणि रचनात्मक बाजूने मंथन सुरू होते. ते सुरू राहणार आहे. सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या वतीने जे उपक्रम उपरे काकांनी हाती घेतले होते, ज्या उद्दिष्टांनी सुरू केले होते त्यात तसूभरही कमतरता आलेली नाही. हे त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी पुढे होऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. हनुमंत उपरे हे एक विचाराचं कृतिशील रसायन होते हा वास्तवी अनुभव. 

COMMENTS