राहाता : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने मतदान करताना व्यक्तीपेक्षा विचार, निष्ठा आणि महाविकास आघाडीच्या तत्त्वांना प्राधान्य दिले. त्यामुळे नि
राहाता : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने मतदान करताना व्यक्तीपेक्षा विचार, निष्ठा आणि महाविकास आघाडीच्या तत्त्वांना प्राधान्य दिले. त्यामुळे निवडून आल्यानंतर सत्तेसाठी पक्षांतर करणे म्हणजे मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा आणि त्यांच्या विश्वासाचा अपमान आहे, अशी परखड टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रभावती जनार्दन घोगरे यांनी केली.
त्या म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये मतदारांनी दिलेला कौल हा पाच वर्षांसाठी जपण्याची नैतिक जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. निवडणुकीत मिळालेले यश हे केवळ एका व्यक्तीचे नसून त्यामागे पक्षाची विचारधारा, पक्षाचे चिन्ह, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे योगदान आणि हजारो कार्यकर्त्यांचे अहोरात्र परिश्रम असतात. अशा परिस्थितीत निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे म्हणजे जनतेच्या विश्वासाशी आणि लोकशाही मूल्यांशी केलेली प्रतारणा होय.
घोगरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर कोणाला आपली राजकीय भूमिका बदलायची असेल, तर त्यांनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नव्या पक्षाच्या चिन्हावर पुन्हा जनतेसमोर जावे. जनतेचा खरा कौल काय आहे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मतदारांना आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही विचार, निष्ठा आणि तत्त्वनिष्ठ राजकारणाची राहिली आहे. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांनी जपलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतराचे राजकारण दुर्दैवी असून, ते लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना धक्का देणारे आहे.
“सत्ता आणि पदे क्षणिक असतात; मात्र जनतेचा विश्वास हा कायमस्वरूपी असतो. सत्तेच्या मोहापायी जनतेच्या भावनांशी खेळ करणाऱ्यांना जनता कधीच माफ करत नाही. लोकशाहीत जनताच अंतिम न्यायाधीश आहे आणि योग्य वेळी ती आपला निर्णय नक्कीच देईल,” असेही प्रभावती घोगरे यांनी म्हटले.

COMMENTS