मुंबई/प्रतिनिधी ः राज्य मंत्रिमंडळामध्ये अजित पवार गटाचा समावेश होवून 10 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही खात्यांचे वाटप होईना. गेल्या दोन
मुंबई/प्रतिनिधी ः राज्य मंत्रिमंडळामध्ये अजित पवार गटाचा समावेश होवून 10 दिवसांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही खात्यांचे वाटप होईना. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उशीरा रात्रीपर्यंत बैठका सुरू असल्या तरी, त्यातून खाते वाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता तिन्ही नेते दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून, दिल्ली दरबारातूनच आता खात्याचा तिढा सोडवला जाणार आहे.
थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दरबारात हा प्रश्न मांडला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जोपर्यंत खाते वाटप होत नाही तोपर्यंत विस्तार करता येणार नाहीये. खाते वाटपावरच मंत्र्यांची संख्या ठरणार आहे. खाते वाटपानंतर किती मंत्र्यांना शपथ द्यायची आणि त्यांना कोणती खाती द्यायची हे ठरणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही लटकला आहे. खाते वाटपाचा तिढा सुटत नसल्याने हा प्रश्न दिल्ली दरबारी जाणार आहे. बुधवारी रात्रीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दिल्लीला रवाना होणार आहे. दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन खाते वाटपावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. युतीत सध्या भाजपकडे अर्थखाते आहे. मात्र, अर्थ खाते अजित पवार यांना देण्यास शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. गृहखाते हे फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. तर महसूल खाते काढून राधाकृष्ण विखे पाटील यांची नाराजी ओढवून घेता येणार नाही. तर, अर्थखाते राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपसमोर धर्मसंकट उभे राहिले आहे. या शिवाय आणखी दोन ते तीन खात्यांवरून महायुतीत बेबनाव आहे. प्रमुख खाती न सोडण्याचा शिंदे गटाने निर्धार केला आहे. तर राष्ट्रवादीलाही महत्त्वाची खाती हवी आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत जाऊनच या खाते वाटपावर तोडगा काढला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
तीनही पक्षात सहमती होईना – गेली तीन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठका सुरू आहेत. वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत या तिन्ही नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. त्यावर खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा होत आहे. काही खात्यांबाबत या तिन्ही पक्षांची सहमती झाली आहे. पण दोन ते तीन खात्यांबाबत या तिन्ही पक्षांची अजून सहमती होताना दिसत नाही. शिंदे गटात अनेक आमदार मंत्रिपदाची आस लावून बसले आहेत. त्यामुळे आपल्या वाट्याचे एकही मंत्रिपद राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गट उत्सुक नाही. त्यामुळे हा तिढा वाढल्याचे सांगितले जात आहे.
COMMENTS