लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी राजकीय पक्षांची म्हणजे महायुती आणि महाविकासआघाडी या दोन आघाडींची जागा वाटपाच्या संदर्भात तारांबळ उडायल
लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली, तसतशी राजकीय पक्षांची म्हणजे महायुती आणि महाविकासआघाडी या दोन आघाडींची जागा वाटपाच्या संदर्भात तारांबळ उडायला लागली आहे. तसं पाहिलं तर, दोन्हीकडच्या आघाड्यांमध्ये जागा वाटपाच्या प्रश्नावर वादविवाद नक्कीच आहे. महाविकास आघाडीनंतर सत्तेवर आलेल्या महायुतीत सामील असलेल्या, शिवसेनेतून फुटून निघालेल्या एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटून निघालेला अजित पवार गट हा सामील झाल्यानंतर महायुती ही मोठी झाली. महायुतीत सामील असलेल्या नेत्यांना मूळ पक्ष जरी मिळाला तरी, भारतीय जनता पक्ष जो या महायुतीतला मोठा घटक आहे, त्यांचं असं ठाम मत आहे की, महायुतीत सामील असलेल्या दोन्ही पक्षांची ताकद त्यांच्या मूळ नेत्यांच्या एवढी नाही. त्यामुळे जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीतील शिंदे आणि अजित पवार या दोन्हीच्या पक्षांना तिकीट वाटपात फार मोठी संख्या मिळेल असे दिसत नाही. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेहमीसारखे चाललेले आहे. तर, उद्धव ठाकरे यांचे धोरण आक्रमक असल्यामुळे ते महाविकास आघाडी च्या पक्ष्यांमध्ये उठून दिसतात. एकंदरीत शरद पवार, काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि आता काही प्रमाणात आघाडीतून बाहेर पडली नसलेल्या वंचित बहुजन आघाडीचाही कदाचित या जागा वाटपामध्ये समावेश होऊ शकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, काहीही असले तरी या आघाडीला देखील लोकसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वी जागा वाटपांचा तिढा सोडवावा लागेल. अन्यथा, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पक्षांना राज्यात आणि इंडिया आघाडीला केंद्रात राजकीय आक्रमण घेणे संभव होऊ शकणार नाही. आगामी आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या घोषणा होतील, हे लक्षात घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत न्याय यात्रा आटोपती घेऊन २० मार्च ऐवजी १६ मार्च रोजी मुंबईत प्रवेश करण्याचे ठरवले आहे. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीच्या घोषणा आता होणारच, याचे हे संकेत आहेत. लोकसभा निवडणूक कोणत्याही राजकीय आघाडीसाठी निश्चितपणे संघर्षमय असेल. सत्ताधारी असो विरोधी आघाडी असो पण संघर्ष हा निश्चितपणे कठीण आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम क्षणापर्यंत कोणालाही अंदाज वर्तवता येऊ शकत नाही की, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील. लोकसभा निवडणुकीत विजयाचा अंदाज कोणत्याही पक्षाला नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही आघाडीला देखील तो अंदाज नाही. याचा हा अर्थ आहे की, आगामी निवडणुका या पूर्णतः जनतेच्या मर्जीवर गेलेल्या आहेत. जनता या निवडणुकीचा अतिशय महत्त्वपूर्ण घटक ठरणार आहे. अर्थात, मतदान हे लोकांचेच असते; परंतु, लोकांच्या मताचा पूर्व अंदाज प्रत्येक निवडणुकीच्या आधी लागत असतो. मात्र, यावेळी अनेक सर्वेक्षण होऊन देखील लोकांच्या किंवा जनमताचा कौल कळत नाही. याचा अर्थ जनतेच्या मनात काय आहे, कोणत्याही नेत्यांना किंवा राजकीय सर्वेक्षकांना कळत नाही. निवडणूक आयोग आणि राजकीय पक्ष यांना फक्त आपल्या उमेदवारांची घोषणा आणि निवडणुकीच्या तारखांच्या घोषणा करायची आहे. या व्यतिरिक्त सर्व काही जनतेच्या मनावर आता अवलंबून आहे. कारण, या निवडणुकीत लोकमत अजूनही कळायला कोणताही मार्ग नाही. कारण, लोकांचा कौल या निवडणुकात नेतृत्वाला देखील कळत नाही. अशा प्रकारे जेव्हा लोक निवडणुकीवर हावी होतात, तेव्हा कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज कोणालाही बांधता येऊ शकत नाही. हीच या निवडणुकीची खरी वैशिष्ट्ये ठरणार आहे. १९७७ नंतर प्रथमच देशामध्ये असे वातावरण दिसू लागले आहे.
COMMENTS