बिनविरोधची भाषा फक्त तोंडीच…गुरुजी लढण्याच्या तयारीत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिनविरोधची भाषा फक्त तोंडीच…गुरुजी लढण्याच्या तयारीत

शिक्षक बँकेत अजून एकही माघार नाही, दोन दिवस मुदत बाकी

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत छोटी-मोठी मंडळे मिळून 12 संघटना उतरल्या आहेत. प्रचारातील आरोप-प्रत्यारोपामुळे ब

पत्रकार बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला, कारागृहातच राहणार मुक्काम
नवस फेडण्यासाठी चक्क भाविक चालतात विस्तवावरून.
वीज वापरावर लक्ष ठेवा,’वर्क फ्रॉम होम’मुळे वापर वाढण्याची शक्यता

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत छोटी-मोठी मंडळे मिळून 12 संघटना उतरल्या आहेत. प्रचारातील आरोप-प्रत्यारोपामुळे बँकेची बदनामी होते व शिक्षकांचीही अप्रतिष्ठा होते म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याची तोंडी चर्चा सुरू आहे. पण प्रत्यक्षात कृती शून्य आहे. अर्ज माघारीला दोन दिवस राहिले असताना निवडणूक रिंगणात उतरलेला एकही ‘गुरूजी’ मागे हटण्यास तयार नाही. परिणामी, बँकेची रणधुमाळी यंदाही नेहमीप्रमाणे रंगण्याची चिन्हे आहेत.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि सर्व विरोधी शिक्षक संघटना आणि मंडळाच्या इच्छुकांनी विक्रमी 799 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. आता माघारीसाठी आज (शुक्रवारी, 8 जुलै) आणि सोमवार (दि.11) हे दोनच दिवस बाकी आहेत. उद्या शनिवारी-रविवारी सुट्टी असल्याने निवडणूक कामकाज होणार नाही. त्यामुळे राहिलेल्या दोन दिवसांच्या कालावधीत माघारीवरून शिक्षक नेत्यांच्या मोठा ताप होणार आहे. अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करतानाच अनेकांकडून निवडणुकीतून माघार घेत असलेला विड्रॉल अर्जही लिहून घेतला असल्याने व तो शिक्षक नेत्यांच्या ताब्यात असल्याने नेत्यांना काहीसे सोपे होणार असले तरी वाढत्या इच्छुकांमुळे सर्वच मंडळाच्या नेत्यांची उमेदवार निश्‍चित करताना दमछाक होणार आहे.
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी सत्ताधारी बापूसाहेब तांबे यांच्यासह विरोधी मंडळाचे नेते डॉ. संजय कळमकर, रावसाहेब रोहोकले, आबासाहेब जगताप, राजेंद्र शिंदे, कल्याणराव लवांडे, एकनाथ व्यवहारे, दिनेश खोसे, सचिन नाबदे या शिक्षक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे बँकेसाठी तब्बल 799 इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत. आता यापैकी माघार कोणी घ्यायची व अंतिम उमेदवारी कोणाला द्यायची याची नेतेमंडळीत खलबते सुरू आहेत. मात्र, हे होत असताना ज्यांना अर्ज दाखल करायला लावला, त्यांना कसे थांबवायला लावायचे, असा प्रश्‍नही शिक्षक नेत्यांसमोर आहे.
सध्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वच मंडळाची वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका आहे. काही मंडळांची अन्य मंडळांशी आघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, त्यास मूर्त स्वरूप अद्याप आलेले नाही. साडे दहा हजार शिक्षक सभासद असणार्‍या बँकेच्या निवडणुकीत साडेतीन हजारांहून मत जे मंडळ घेईल, ते सत्तेत येणार आहे. यामुळे आपले समर्थक आणि सोबत कोणाला घ्यायचे याचा विचार सुरू आहे. दरम्यान, आता माघारीसाठी दोन दिवस शिल्लक असल्याने या दोन दिवसांत किती उमेदवारी माघार घेणार याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीसाठी सर्व प्रमुख मंडळांनी नगरमध्ये कार्यालये सुरू केले आहे. मंडळाच्या खर्चासाठी प्रमुखांकडून निधीसाठी जुळवाजुळव सुरू आहे. साधारण 20 ते 30 हजारांपर्यंत शिक्षकांकडून पैसे घेण्यात येत आहेत. उमेदवारांचे डिपॉझिट जमा झाल्यावर हे पैसे परत कार्यकर्ते असणार्‍या शिक्षकांना देण्यात येणार आहे.

असे आहेत उमेदवारी अर्ज
संगमनेर 41, नगर 37, पारनेर 37, कोपरगाव 25, राहाता 28, श्रीरामपूर 36, जामखेड 35, पाथर्डी 39, राहुरी 25, शेवगाव 25, श्रीगोंदा 38, कर्जत 29, नेवासा 38 आणि अकोले 26 यांचा समावेश आहे.

COMMENTS