Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानदीप विझला; परंतु विचारांचा प्रकाश अमर

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने नांदेड शोकाकुलनांदेड । प्रतिनिधीस्वामी

विद्यार्थ्यांनी क्षमता ओळखून ध्येय ठरवावे-प्रियंका पवार
तहसील कार्यालयातील जप्त वाळूसह ऑटो चोरणारा अटकेत; किनवट पोलिसांची धडक कारवाई
Nanded : सरकारच्या जीआरची होळी करत रयत क्रांती संघटनेचे आंदोलन | LokNews24

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने नांदेड शोकाकुल
नांदेड । प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचे संस्थापक कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत प्रा. डॉ. जनार्दन वाघमारे यांचे लातूर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
विद्यापीठाच्या स्थापनेनंतर पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडली नाही, तर संस्थेच्या वैचारिक पायाभरणीत मोलाची भर घातली. अभ्यासक्रमांची गुणवत्ता, संशोधनवृत्ती, पारदर्शक प्रशासन आणि मूल्याधिष्ठित निर्णयप्रक्रिया यावर त्यांनी सातत्याने भर दिला. ‘विद्यार्थीहित, शिक्षकांचा बौद्धिक विकास आणि समाजाभिमुख संशोधन’ ही त्यांची त्रिसूत्री विद्यापीठाच्या वाटचालीचा मार्गदर्शक ठरली. लातूरच्या शैक्षणिक उभारणीत त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. राजर्षी शाहू महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापनाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. पुढे लातूर नगरपालिका तसेच राज्यसभा सदस्य म्हणूनही त्यांनी शिक्षण, सामाजिक समता आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. अनेक वैचारिक ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्यात व समाजचिंतनात योगदान दिले. त्यांची वक्तृत्वशैली अभ्यासपूर्ण, परखड आणि प्रेरणादायी होती. ‘कर्ता सुधारक, तत्वनिष्ठ शिक्षक’ अशी त्यांची ओळख समाजात निर्माण झाली होती. डॉ. वाघमारे सरांच्या निधनाची वार्ता संपूर्ण विद्यापीठ परिवारासाठी अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे विद्यापीठाला वैचारिक अधिष्ठान लाभले. त्यांनी संस्थात्मक संस्कृतीत शिस्त, पारदर्शकता आणि मूल्यनिष्ठा रुजविली. आज आपण एक खरा शैक्षणिक मार्गदर्शक गमावला आहे. त्यांच्या कार्यस्मृती भावी पिढ्यांना प्रेरणा देतील. लातूरच्या ओळखीला राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यात वाघमारे सरांचे मोठे योगदान आहे. प्राध्यापक, कुलगुरू, लोकप्रतिनिधी या प्रत्येक भूमिकेत त्यांनी कार्यकुशलतेचा ठसा उमटविला. तत्वनिष्ठता आणि वैचारिक प्रामाणिकता हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. मराठवाड्याचा हा थोर सुपुत्र हरपल्याची वेदना असह्य आहे. सर हे विद्वान, दृष्टा आणि विद्यार्थीप्रिय गुरु होते. त्यांच्या जाण्याने असंख्य विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक हरपला आहे. उत्कृष्ट संसदपटू आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणूनही त्यांनी आदर्श घालून दिला. ‘सामान्यातून जन्मून असामान्यत्वाकडे झेपावलेला उमदा हिरा’ आज आपल्यातून निघून गेला. डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या पार्थिवावर लातूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. नांदेडमधील विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि विद्यापीठ परिवाराने शोकसभांचे आयोजन केले आहे. त्यांच्या जाण्याने एक विचारवंत, तत्वनिष्ठ शिक्षक आणि समाजाभिमुख शिक्षणाचा ध्यास घेतलेला नेतृत्वगुणी व्यक्तिमत्त्व हरपले असले, तरी त्यांनी पेटविलेला ज्ञानदीप पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.

COMMENTS