नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी इंडिगोविरोधात कठोर पावले उचलली आहेत. वारंवार नियमभंग आणि

नवी दिल्ली : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी इंडिगोविरोधात कठोर पावले उचलली आहेत. वारंवार नियमभंग आणि कार्यपद्धतीतील गंभीर प्रणालीगत त्रुटी आढळून आल्याने डीजीसीएने इंडिगोवर 22.20 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासोबतच, ‘सिस्टिमिक रिफॉर्म अॅश्युरन्स स्कीम’अंतर्गत 50 कोटी रुपयांची बँक हमी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक सुधारणा समाधानकारकपणे अंमलात आल्यानंतरच ही रक्कम टप्प्याटप्प्याने परत करण्यात येणार आहे.
3 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत इंडिगोच्या उड्डाणसेवेत मोठ्या प्रमाणावर व्यत्यय निर्माण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या तीन दिवसांत कंपनीने तब्बल 2,507 उड्डाणे रद्द केली, तर 1,852 उड्डाणे विलंबाने झाली. परिणामी, देशभरातील विविध विमानतळांवर तीन लाखांहून अधिक प्रवासी अडकून पडले होते. डीजीसीएने नेमलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीच्या अहवालानुसार, उपलब्ध संसाधनांचा अतिरेकी वापर हे या संकटाचे प्रमुख कारण ठरले. क्रू आणि विमानांचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करताना आवश्यक ‘बफर मार्जिन’ पूर्णतः संपुष्टात आणण्यात आले होते. याशिवाय, प्रणालीतील सॉफ्टवेअर त्रुटी आणि संभाव्य संकटांसाठी पुरेशी नियामक तयारी नसणे, हेही व्यत्ययास कारणीभूत ठरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर इंडिगोने आदेशाची दखल घेतल्याचे स्पष्ट केले असून, आवश्यक सुधारात्मक उपाय तातडीने राबवले जातील, असे कंपनीने म्हटले आहे. प्रवाशांना दिलासा देण्यासाठी, संबंधित कालावधीत बाधित झालेल्या सर्व प्रवाशांना तिकिटाची पूर्ण परतफेड करण्यात आली आहे. तसेच ‘काळजीचा इशारा’ म्हणून प्रत्येकी 5,000 रुपयांचे, 12 महिन्यांसाठी वैध असलेले दोन ट्रॅव्हल व्हाउचर देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात घातल्यास कठोर कारवाई
भारतीय विमान वाहतूक क्षेत्रात नियामक संस्थेच्या कठोर भूमिकेचे हे एक महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे. नफा आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेच्या स्पर्धेत प्रवाशांची सुविधा व सुरक्षितता धोक्यात घालणे सहन केले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश डीजीसीएने दिला आहे. कॉर्पोरेट प्रशासन आणि नियोजनातील त्रुटी किती गंभीर परिणाम घडवू शकतात, याकडेही या घटनेने लक्ष वेधले आहे. दरम्यान, इंडिगोच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांनी जारी केलेल्या संदेशात, आदेशांचे गांभीर्य ओळखून सर्व भागधारकांसाठी, विशेषतः प्रवाशांसाठी, जबाबदारीने आणि वेळेत योग्य निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही दिली आहे.

COMMENTS