Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिग्गज कलाकारांच्या अदाकारीने शुक्रवारी रंगणार औंध संगीत महोत्सव

औंध / वार्ताहर : ग्रामीण भागातील महत्वाचा व लोकप्रिय असणारा औंध संगीत महोत्सव यंदा शुक्रवार, दि. 14 ऑक्टोंबर रोजी होत आहे. यंदा औंध संगीत महोत्सव

परप्रांतीयांना डांबून ठेवल्याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके
विशाळगड वाचविण्यासाठी विशाल आंदोलनाची वेळ : खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर

औंध / वार्ताहर : ग्रामीण भागातील महत्वाचा व लोकप्रिय असणारा औंध संगीत महोत्सव यंदा शुक्रवार, दि. 14 ऑक्टोंबर रोजी होत आहे. यंदा औंध संगीत महोत्सवाचे 82 वे वर्ष असल्याची माहिती अशी शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने संयोजक अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी यांनी दिली. यावेळी सुनील पवार उपस्थित होते.
औंध संगीत महोत्सव हा भारतातील महत्वाच्या संगीत महोत्सवांपैकी एक असून या महोत्सवाची सुरुवात 1940 साली ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अनंत मनोहर जोशी उर्फ अंतुबुवा व त्यांचे चिरंजीव, ज्येष्ठ गायक व व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी या पितापुत्रांनी केली. हळूहळू या उत्सवाचे स्वरूप वाढत गेले आणि 1981 साली पं. गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करण्यात आली.
गेली 81 वर्षे अव्याहतपणे साजरा केल्या जाणार्‍या या संगीत महोत्सवात अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. उल्हास कशाळकर, पं. व्यंकटेशकुमार, पं. उदय भवाळकर, भरतनाट्यम् नृत्यांगना सुचेता भिडे, कथक नृत्यांगना रोहिणी भाटे, पं. सुरेश तळवलकर, पं. भाई गायतोंडे, पं. नयन घोष यांसारखे अनेक तबला वादक, हार्मोनियम वादक पं. तुळशीदास बोरकर, पं. अरविंद थत्ते यांसारख्या अनेक प्रतिभावान व ज्येष्ठ कलाकारांनी आजवर या महोत्सवात आपली कला सादर केली आहे.
उत्सवाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात साजरा होणारा हा एकमेव उत्सव आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये अभिजात संगीताचा प्रचार व प्रसार हा उद्देश या उत्सवामुळे साधला जातो. महोत्सव तीन सत्रांमध्ये साजरा होणार आहे. यावर्षी पहिले सत्र शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल. प्रारंभी दीपप्रज्वलननाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे. यावेळी औंध संस्थानच्या अधिपती गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, माजी आ. प्रभाकर घार्गे, श्रध्दा पवार, सरपंच सोनाली मिठारी, उपसरपंच दिपक नलवडे, शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या विश्‍वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, पं. अरुण कशाळकर, सुनील पवार, माधवी गोडबोले, अपर्णा फडके यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानने ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने आयोजित केलेला औंध महोत्सव हा सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी सर्व रसिकांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून अभिजात शास्त्रीय संगीताचा आनंद घ्यावा, असे आवाहन शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.

COMMENTS