Homeताज्या बातम्या

ठाकरे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’वर शिक्कामोर्तब ! ठाकरेंच्या बैठकीला सहा खासदार गैरहजर

पक्षाकडून 'कारण दाखवा' नोटीस जारी, कायदेशीर कारवाईचा इशारा मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संसदीय दलाची बैठक गुरु

ठाकरेंच्या खासदारांने घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट
ठाकरे सेनेत मोठी फूट! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; ६ खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेनंतर आज ठाकरेंच्या खासदारांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ठाकरे गटाला मोठा धक्का? दिल्लीतील बैठकीला ९ पैकी ६ खासदार गैरहजर! –  Maharashtra Crime Times

पक्षाकडून ‘कारण दाखवा’ नोटीस जारी, कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई/नवी दिल्ली : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संसदीय दलाची बैठक गुरुवारी पार पडली. बंडखोर खासदारांना व्हीप बजावून देखील सहाही खासदार या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने या खासदारांविरोधात ठाकरे गटाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पक्षाच्या आदेशानंतरही बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या खासदारांना ‘कारण दाखवा’ (शो-कॉज) नोटीस बजावण्यात येणार असून, सात दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर न दिल्यास पुढील कायदेशीर आणि संसदीय कारवाई केली जाईल, असा इशारा पक्षाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत यांनी दिला.

दिल्लीतील पक्षाच्या संसदीय बैठकीला केवळ अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे तीनच खासदार उपस्थित होते. पक्षाने सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सहा खासदार गैरहजर राहिल्याने ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत यांनी सांगितले की, पक्षाचा आदेश सर्व सदस्यांना मिळाला होता. त्यानंतरही काही खासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण मागवणे आवश्यक आहे.

सर्व संबंधित खासदारांना नोटीस पाठविण्यात येणार असून, सात दिवसांत उत्तर देणे बंधनकारक असेल. या प्रकरणात पक्ष केवळ अंतर्गत कारवाईवर थांबणार नसून लोकसभा अध्यक्षांनाही याबाबत निवेदन देणार असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या भूमिकेविरोधात कोणतीही हालचाल झाल्यास त्यावर संसदीय नियमांनुसार निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या दाव्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यावर प्रतिक्रिया देताना सावंत यांनी, असे पत्र दिले असल्यास ते सार्वजनिक करावे, असे आव्हान दिले.

खासदारांवर दबाव आणल्याचा राऊतांचा आरोप राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही अनुपस्थित खासदारांवर आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. काही खासदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही सदस्य दिल्लीत नसल्याचा दावा करत त्यांच्या ठावठिकाण्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. राऊत यांनी पक्षाची ताकद जनतेच्या पाठिंब्यात असल्याचे सांगत, काही खासदारांच्या जाण्याने पक्ष कमकुवत होणार नसल्याचा दावा केला. तसेच बंडखोर खासदारांना मतदारसंघात जनतेचा सामना करावा लागेल, असेही ते म्हणाले.

गैरहजर राहिलेले ‘ते’ सहा खासदार कोण? ठाकरे गटाच्या बैठकीला संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील हे खासदार उपस्थित नव्हते. या सर्वांना कारण दाखवा नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पक्षान्तरबंदी कायद्यानुसार कारवाई होणार का? लोकसभेत ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार आहेत. त्यापैकी सहा खासदारांनी एकत्रित भूमिका घेतल्यास पक्षान्तरबंदी कायद्यातील दोन-तृतीयंश (२/३) संख्याबळाची अट पूर्ण होऊ शकते. त्यामुळे या घडामोडींना केवळ राजकीय नव्हे तर कायदेशीर महत्त्वही प्राप्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाला निर्णायक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS