देशात सध्या वाचाळवीरांचे पीक जोमात आले आहे. कोणत्याही पिकाला पोषक वातावरण, योग्य पाऊस, योग्य खते आणि बीजपुरवठा योग्य असले की, पीक जोमात येते. मात

देशात सध्या वाचाळवीरांचे पीक जोमात आले आहे. कोणत्याही पिकाला पोषक वातावरण, योग्य पाऊस, योग्य खते आणि बीजपुरवठा योग्य असले की, पीक जोमात येते. मात्र देशात वाचाळवीरांचे पीक जोमात येण्यासाठी तशी पार्श्वभूमी तयार करण्यात येत आहे. या वाचाळवीरांना लगाम घातला नाही तर, या धार्मिक संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला हेट स्पीचप्रकरणी फटकारले होते. राज्यात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत, त्यांच्याविषयी गैरसमज पसरवत त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, अकोला, शेवगाव, मालेगाव या ठिकाणी जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू तो केवळ वाचाळ वक्तव्यांनीच. सरकारमधील मंत्री शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेच्या प्रसंगाचे उदाहरण देत शिंंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या सुरत, गुवाहाटी, गोवा या प्रवासाची तुलना केली होती. त्यानंतर कहर म्हणजे बुधवारी ‘इंडिक टेल्स’ या संकेतस्थळावर सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सदनातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. वास्तविक पाहता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या कर्तबगार महिला होवून गेल्या. त्यांनी आपले आयुष्य जनतेच्या कल्याणासाठी वाहून घेतले. जनतेची सेवा करतांना सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली, मात्र त्यांनी मागे न हटता शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची सेवा केली. स्त्री शिक्षणांसाठी त्यांनी दिलेले योगदान वादातीत असतांना, त्यांच्याविषयी गरळ ओकणे आणि महाराष्ट्र सदनातील त्यांचा पुतळा हटवणे यातून यामागचे राजकारण स्पष्ट होते. इंडिक टेल्स या वेबसाईटवर आज-उद्या कारवाई होईलही, मात्र पुतळ्याचे काय. हा सरकार धार्जिणा कार्यक्रम तर नव्हे ना, असा सवाल उपस्थित होत आहे.
भारतीय संविधान स्वीकृत करण्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 25 नोव्हेंबर 1949 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक इशारा देतांना म्हटले होते की, आपण विरोधाभासांनी भरलेल्या जीवनात प्रवेश करतो आहोत, राजकारणात समानता असेल आणि सामाजिक, तसेच आर्थिक जीवनात ती नसेल असे सांगून ते म्हणाले होते, “राजकारणात आपण ‘एक माणूस-एक मत’ आणि ‘एक मत-एक मूल्य हे तत्त्व’ मान्य करीत आहोत. मात्र, सामाजिक आणि आर्थिक जीवनात सामाजिक आणि आर्थिक बांधणीमुळे ‘एक माणूस-एक मूल्य’ या सूत्राला वेशीवर टांगणे आपण चालू ठेवले तर आपण आपली राजकीय लोकशाही धोक्यात आणू, हा त्यांचा इशारा खरा होतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता देशाचा कारभार संविधानानुसार चालतो. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांनी धर्माचे प्रदर्शन मांडण्याची गरज नाही. धर्म हा प्रत्येकाने घराच्या चार भिंतीत मर्यादित ठेवला तर, धार्मिक संघर्ष पेटणार नाही. मात्र धार्मिक संघर्ष पेटवण्यासाठी बेताल वक्तव्य करण्यात येत आहे, जनतेची माथी भडकवण्यात येत आहे. आणि त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा एककलमी कार्यक्रम काही पक्षांकडून सुरू आहे. भारत देशासाठी असे धोरण धोक्यादायक आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. अन्यथा वाचाळवीरांना आवरणे अवघड होवून जाईल. देशात सध्या अनेक प्रश्न प्रलंबित आहे. वास्तविक पाहता, बेरोजगारी, महागाई, शेतकर्यांचे प्रश्न अजूनही तसेच प्रलंबित आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज असतांना धार्मिक संघर्ष पेटवण्याचे प्रयत्न सुरू आहे. आपले वर्तन ‘ये रे माझ्या मागल्या’ असेच राहणार? धार्मिक विद्वेष हा कधीच कुणाचे भले करू शकत नाही, हाच जगाचा इतिहास आहे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी असा प्रयत्न कायम देशांच्या अंगलटच येतो आणि त्यातून हा द्वेष निर्माण करणारेही सुटू शकत नाहीत.
COMMENTS