Homeताज्या बातम्यासंपादकीय

तलाठी परीक्षेतील नवा घोळ

पोलिस भरती असो की, टीईटी परीक्षा असो की, तलाठी परीक्षा या सर्व परीक्षांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. राज्यात नुकत्याच तलाठी परी

भारतीय हरितक्रांतीचा जनक
राजकारणाचा खरा चेहरा
ठाकरे गटाची सोयीची भूमिका

पोलिस भरती असो की, टीईटी परीक्षा असो की, तलाठी परीक्षा या सर्व परीक्षांना भ्रष्टाचाराचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे. राज्यात नुकत्याच तलाठी परीक्षेचे मार्क जाहीर झाल्यानंतर जो गदारोळ सुरू झाला आहे, त्यावरून या परीक्षेमागची पूर्वपीठिका लक्षात घेते. खरंतर या परीक्षा घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा फी आकारून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करण्यात आला. सर्वसाधारण प्रवर्गासाठी हजार रूपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रूपये फी आकारण्यात आली. विधीमंडळात अनेक आमदारांनी, तसेच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने अनेकवेळेस फी कमी करण्याची मागणी करण्यात आली. मात्र पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठीच आम्ही इतकी फी आकारत असल्याचे राज्य सरकारच्या वतीने विधीमंडळात सांगण्यात आले. मात्र याच तलाठी भरतीचा निकाल जेव्हा जाहीर झाला तेव्हा, या परीक्षेतील पारदर्शकपणा किती फोल होता, हा लक्षात येतो. मध्यतंरी दिवाळीच्या काळातच तलाठी परीक्षा पास होण्यासाठी 15 लाखापासून 25 लाखापर्यंत पैसे अनेक उमेदवारांनी मोजल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र या अफवा असेल, म्हणून अनेकांनी दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा या परीक्षेचा निकाल लागला तेव्हा या परीक्षेत उमेदवारांचे गुण पाहून थक्क व्हायला होते. कारण या परीक्षेत वनभरती परीक्षा जी तलाठी भरतीच्या अभ्यासक्रमावर आधारित आणि त्याच पद्धतीची असते, त्या परीक्षेत 54 मार्क मिळवणारा उमेदवार तलाठी भरतीमध्ये मात्र अव्वल येवून 214 मार्क मिळवतो, यामुळे या परीक्षेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होतांना दिसून येत आहे.

विशेष म्हणजे या परीक्षेचे पेपर छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सांगली या ठिकाणी फुटल्याचे समोर आल्यानंतर देखील कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची दखल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतली असून, याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरावे द्या, तलाठी परीक्षाच रद्द करतो, अशी भूमिका घेतली आहे. खरंतर पुरावे गोळा करणे पोलिसांचे काम आहे, तपास यंत्रणांचे काम आहे, त्यासाठी तपास करणे आवश्यक असतांना, आधीच पुरावे द्या, नंतर निर्णय घेतो ही भूमिकाच विसंगत आहे. खरंतर वर्षांनुवर्षे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा बहुसंख्य वर्ग हा ग्रामीण भागातून आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतून आलेला असतो. त्यांचे माय-बाप हाडाची काड करून आपल्या मुलांना पैसे पाठवतात. मुलंही जीवाचे रान करून अभ्यास करतात, मात्र स्पर्धा परीक्षेतील अशा घोळामुळे त्यांच्या पदरी निराशा येते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा या पारदर्शक पद्धतीनेच घेण्याची खरी गरज आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या परीक्षेप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांची सत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे. या समन्वय समितीने त्यांच्या एक्सवर केलेल्या आरोपानुसार, दोन निकाल एकाच व्यक्तीचे आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 गुण आणि तलाठीमध्ये 200 पैकी 214 गुण घेऊन टॉप केले आहे. यावरून समजून जावे की, पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99 टक्के जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे, असा आरोप केला आहे.

तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे आमचे आधीपासूनच मत आहे, निकालानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसतो आहे. तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत, अशा बर्‍याच मुलांना 190 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसर्‍या पदावर नोकरी करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी व्हावी, अशी मागणी या समन्वय समितीने केली आहे. त्यामुळे या विद्यमान सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची अपेक्षा आहे.

COMMENTS