Homeताज्या बातम्यासंपादकीय

राजकारणातील गाफीलपणा

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवसांचा अवधी असतांना भाजपने तब्बल 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून राजकीय आघाडी घेतल्याचे दिसून येत आ

काँगे्रसमधील गोंधळ
महाविकास आघाडीतील वितंडवाद
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भूमिका आणि काही प्रश्‍न

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काही दिवसांचा अवधी असतांना भाजपने तब्बल 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून राजकीय आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. राजकारणात भाजप संपूर्णपणे व्यावसायिक झाल्याचे दिसून येत आहे. कारण भाजपने कधीही व्यक्तींना मोठे केले नाही तर त्यांनी पक्षाला मोठे उलट केले. याउलट काँगे्रसने नेहमीच व्यक्तींना प्राधान्य दिले. त्यामुळे त्या त्या राज्यात सरंजामदार राजकारणी तयार झाले होते. त्यांना वगळून राजकारण करताच येत नाही, असा काँग्रेसचा समज होता. परिणामी त्याच घरात मुख्यमंत्रीपद, त्याच घरात इतर महत्वाचे पद देण्यात काँगे्रसने धन्यता मानली. राजस्थानात गेहलोत विरूद्ध पायलट संघर्ष उभा राहिला असतांना काँगे्रस तो संघर्ष मोडून काढू शकली नाही. याउलट मध्यप्रदेशात भाजपने शिवराजसिंह चौहान यांना राज्याच्या राजकारणातून अलगद बाहेर काढले. तरी त्यांनी कुठेही बंडखोरीची भाषा केली नाही. केंद्राने त्यांना नुकतेच लोकसभेचे उमेदवार जाहीर केले असून, त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. मात्र अनेक वर्ष मुख्यमंत्रीपदावर राहणार्‍या चौहान यांना भाजपने एका झटक्यात हटवले. भाजपने जे धक्कातंत्र दाखवले ते काँगे्रस दाखवण्यास नेहमीच अपयशी पडले आहे. राजकारणात नेहमीच सजग राहावे लागते. तरच राजकारणात टिकता येते. राजकारणात कधी गाफील राहिलो तर कधी आपले राजकारण संपेल याचा नेम नसतो. त्यामुळे गाफील राहणे हा राजकारणात मोठा शाप आहे. मात्र काँग्रेस नेहमीच गाफील राहिल्यामुळे काँगे्रस एक दशकापासून केंद्रातील सत्तेपासून दूर आहे.

त्यातही लोकसभा निवडणुकीत भाजपने 195 उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी, काँगे्रसने अजूनही आपल्या उमेदवार निवडलेले नाहीत. त्यामुळे काँगे्रस किती जागांवर लढणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. भाजपने आपल्या पहिल्या यादीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह मोदी सरकारच्या 34 मंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, हेमामालिनी आणि दिवंगत सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांच्यासह 28 महिलांना तिकीट दिले आहे. पहिल्या यादीतील 47 उमेदवारांचे वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे. केरळमधील मलप्पुरममधून डॉ. अब्दुल सलाम यांना उमेदवारी दिली. यादीत एससी प्रवर्गातील 27, एसटीचे 18 आणि ओबीसीचे 57 उमेदवार आहेत. राज्यसभा सदस्य भूपेंद्र यादव (अलवर), मनसुख मांडविया (पोरबंदर), पुरुषोत्तम रूपाला (राजकोट), राजीव चंद्रशेखर (तिरुवनंतपुरम) व व्ही. मुरलीधन (अटिंगल) यांना यंदा लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे भाजप पूर्ण तयारीने आणि ताकदीने मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. याउलट जेव्हा निवडणुकीची तयारी करण्याची वेळ आहे, बैठका घेण्याची वेळ आहे, तेव्हा काँगे्रस भारत न्याय जोडो यात्रा काढतांना दिसून येत आहे. याउलट अशावेळी राहुल गांधी यांनी देशभर सभा घेण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज होती. काँगे्रस पक्षाच्या स्थापनेला उणीपुरी 135 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. स्वातंत्र्यानंतर काँगे्रस कायम सत्तेत राहिली. मात्र आजमितीस काँगे्रसची अवस्था जर्जर म्हातार्‍यासारखी झाली आहे. काँगे्रसने आपल्या संघटनात्मक बांधणीसाठी वेळ दिलेला नाही. दुसरीकडे राहुल गांधी सक्रिय असले, तरी त्यांच्या राजकारणामध्ये सातत्य नाही. त्यामुळे काँगे्रसला कार्यकर्त्यांना, नेत्यांना मार्गदर्शन करेल, किंवा त्यांना दिशा देऊ शकेल, असे नेतृत्व नसल्यामुळे, काँगे्रसकडे सध्या कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. राजकीय कार्यक्रम नसल्यामुळे कार्यकर्ते शांत बसले आहे. देशभरात महागाई, पूरस्थिती, कोरोना नियंत्रण आणण्यात अपयश, यासह अनेेेेक प्रश्‍न उभे आहेत. मात्र विरोधक सक्षम नसल्यामुळे त्यांचा विरोध समोर येत नाही. अशा परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूका होतांना दिसून येत आहे. या निवडणुकींचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधक अजूनही गाफील असल्याचे दिसून येत आहे. तर भाजप जागरूक असून, पुढील दोन दशके सत्ता हातातून जाणार नाही, यासाठी आधीच भाजपने नियोजन आखून ठेवल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS