देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात रेशनिंगच्या धान्याच्या कथित काळाबाजाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 12 ल

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात रेशनिंगच्या धान्याच्या कथित काळाबाजाराविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत 12 लाख 2 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना सोनगाव सात्रळ येथील साई बालाजी फर्निचर शेजारील पत्र्याच्या गोदामात रेशनिंगचा गहू व तांदूळ साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्यासह पथकाने छापा टाकला. यावेळी गोदामात उपस्थित असलेला यासिर सादिक तांबोळी (वय 26, रा. सोनगाव सात्रळ, ता. राहुरी) यास ताब्यात घेण्यात आले. तपासणीदरम्यान गोदामात 6 हजार 990 किलो वजनाचा गहू भरलेल्या 121 गोण्या तसेच 5 हजार 860 किलो वजनाचा तांदूळ भरलेल्या 117 गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त धान्याची किंमत 5 लाख 2 हजार 700 रुपये असून घटनास्थळावरील दोन वाहनांसह एकूण 12 लाख 2 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने परिसरातील रेशन दुकानांतून हे धान्य काळ्या बाजारातून खरेदी केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील कलम 3 व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस उप निरीक्षक अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार सुनिल पवार, रिचर्ड गायकवाड, रमीजराजा अतार आदींनी ही कारवाई केली.

COMMENTS