Homeताज्या बातम्यासंपादकीय

ड्रग्जच्या विळख्यात राज्य

महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. स्वातंत्र्यलढ्यापासूनचा विचार केला तर, प्रबोधनाचे युग सर्वप्रथम महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये आले

विद्युत वाहनांना मंत्र्यांचीच नकारघंटा
आरक्षण आणि आत्महत्यांचे सत्र
आरटीईच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

महाराष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. स्वातंत्र्यलढ्यापासूनचा विचार केला तर, प्रबोधनाचे युग सर्वप्रथम महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये आले होते. अनेक समाजसुधारकांनी सर्वप्रथम या दोन प्रातांमध्ये प्रबोधनाची चळवळ सुरू केली. त्यामुळे प्रबोधनाच्या आणि सुधारणा चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही जन्मभूमी असून, या भूमीत नेहमीच समतेचा विचार पेरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र हाच महाराष्ट्र आता ड्रग्जच्या विळख्यात घट्ट रूतत चालल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दशकांपूर्वी ड्रग्ज केवळ मुंबईसारखे शहर सोडले तर, कुठेही दिसत नव्हते. मात्र आता ड्रग्जचे कारखाने छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, पालघर सारख्या शहरात पसरत असून, त्याची पोलिस प्रशासनाला वार्ता पोहचत नाही, यासारखे शोकांतिका नाही. ललित पाटीलच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ड्रग्ज जाळे समोर येतांना दिसून येत आहे. मात्र ललित पाटीलसारख्या ड्रग्जमाफियाला पोसणारे ते कोन ? हा महत्वाचा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ललित पाटील काही एका दिवसांत जन्माला आलेला नाही, तर ललित पाटील याला कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय तो इतक्या मोठ्या प्रमाणावर विस्तार करू शकत नाही. ड्रग्जचे कारखाने उभे केले जातात आणि त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहचू शकत नाही, असे होवूच शकत नाही, मात्र ड्रग्जचे कारखाने उभे राहत असतांना, पोलिस, राजकीय वरदहस्त असल्यामुळे हे जाळे पसरू शकले. मात्र हे जाळे आता उद्धवस्त होतांना दिसून येत आहे. जगभरात अमली पदार्थांचे सेवन वाढत असून, महाराष्ट्र देखील त्यात मागे नसल्याचे दिसून येत आहे. नव्या अघोरी आनंदाच्या शोधात असणारे गर्भश्रीमंत, निराशा व वैफल्यग्रस्तता विसरण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात असलेले, मध्यमवर्गीय-गरीब युवक अमली पदार्थांच्या सेवनाच्या जाळ्यात अलगद ओढले जात आहेत. अशा युवकांना पुन्हा योग्य मार्गावर आणणारा नातेवाईक व मित्र मिळाला नाही तर त्यांचे जीवन वाया जाते. तरुणांना या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीमा राबविण्याची गरज आहे. पुण्याला विद्येचे माहेर आणि आता आयटी हब व स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते. शिक्षण, नोकरी व उद्योगांमुळे येथे परदेशी पाहून्यांसह परराज्य व वेगवेगळ्या शहरातून तरुणाई आलेली आहे. आजमितीला पुण्यात कोणतीही गोष्ट अगदीच सहज अन् तितकीच झटपट मिळतात. तरी दुसर्‍या बाजूला वांग मार्गाचा रस्ताही तितकाच सोपा अन् सहजरित्या मिळत असल्याचे दिसत आहे. शिक्षण व नोकरीनिमित्त आलेली तरुणाई मात्र, ड्रग्सच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. हातावर पोट भरणारा कामगार वर्ग देखील या माया-जालात अडकला आहे. अमली पदार्थात गांजा, हशीश, हेरॉइन किंवा ब्राऊन शुगर याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. श्रीमंत वर्गातील लोक मात्र महागड्या कोकेन, सिंथेटिक आणि डिझाइनर ड्रग्ज घेतात. असे ड्रग्ज रेव्ह पार्टीजमध्ये वापरले जातात. अमली पदार्थांच्या अतिसेवनाने मेंदूच्या पेशींच्या क्रियात बिघाड होते. व्यसनी व्यक्ती इतरांमध्ये मिसळणे टाळतो. कारण, अमली पदार्थांच्या गुंगीत शुद्ध राहत नाही. वेगवेगळे भास होतात. त्यामुळे शारीरिक हालचालींवरचे नियंत्रण सुटते. सामाजिक-आर्थिक व्यवहारांचे भान राहत नाही. यातून अनेक तरूणांचे जीवन उद्धवस्त होतांना दिसून येत आहे. त्यामुुळे ड्रग्जचा हा विळखा उच्चभू सोसायट्यांपर्यंत मर्यादित राहिला नसून, तो मध्यमवर्गींयापर्यंत येवून पोहचला आहे. कॉलेजमध्ये विद्याविभूषित होण्यासाठी जाणारा मध्यमवर्गीय तरूण कधी ड्रग्जच्या विळख्यात अडकतो, त्याचे त्याला कळत नाही, त्यामुळे या विळख्यातून बाहेर पडण्याची खरी गरज आहे. त्यासाठी सर्वप्रथम ड्रग्जचे अड्डे उद्धवस्त करण्याची गरज आहे. शिवाय अशा उद्योगांना ना पोलिस प्रशासनाने पाठीशी घालण्याची गरज आहे, ना, राजकारण्यांनी. 

COMMENTS