इस्लामपूर : पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनच्या कामाची पाहणी करताना सचिन कोळी, संजय तेवरे, अन्सार हवलदार, सिदू सावंत व नागरिक. इस्लामपूर / प्रतिनि
इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील नेहरूनगर, आनंदनगरमधील महिला व नागरिकांना महिन्याभरात आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावू, असा शब्द दिला होता. हे काम गेल्या दोन दिवसापासून युध्द पातळीवर सुरू झाले असून काही दिवसात या दोन्ही नगरातील प्रामुख्याने मोलमजुरी करणार्या साधारण 400 कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. या परिसरातून या कामाबद्दल समाधान व्यक्तकरण्यात येत आहे.
इस्लामपूर शहरातील बहुचर्चित असलेल्या शिवनगरच्या बाजूला नेहरूनगर व आनंद नगरचा परिसर आहे. या परिसरात प्रामुख्याने मोलमजुरी करणार्या नागरिकांची वस्ती आहे. या परिसरात गेल्या वर्ष-दीड वर्षात पाण्याची मोठी आबाळ आहे. दिवसभर मोल मजुरी करायची आणि सकाळी व संध्याकाळी पिण्याच्या पाण्यासाठी भांडी घेऊन वणवण करावी लागत होती. कूपनलिका अन्यथा नगरपालिकेच्या एखाद्या टँकरने या परिसरातील नागरिकांची तहान भागविली जात होती.
ना. जयंत पाटील यांनी आपल्या सहकार्यांसह या परिसरास एक महिन्यापूर्वी भेट दिली. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक वैभव साबळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सुर्यवंशी, माजी सभापती खंडेराव जाधव, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन कोळी व या परिसरातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. यावेळी येथील महिलांनी आपली गेल्या एक-दीड वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची फरफट सुरू असून आम्ही कामधंदा करून पोट भरायचे का पाण्यासाठी वणवण फिरायचे? या शब्दात आपला पाण्याचा आक्रोश मांडला होता. ना. पाटील यांनी नगरपालिकेचे प्रशासक वैभव साबळे यांच्याशी चर्चा करून महिन्या भरात हा प्रश्न मार्गी लावू, असा शब्द दिला. यानंतर साबळे यांनी तातडीने सर्व प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा केला.
गेल्या दोन दिवसापासून या परिसरात पाण्याच्या टाकीकडून पाईप लाईनचे काम चालू आहे. तिरंगा चौकातून साधारण 400 मीटरची खुदाई करून हे पाईप लाईन करण्यात येत आहे. अतिशय उत्तम दर्जाच्या पाईप घालण्याची खबरदारी घेण्यात आली आहे. एक-दोन दिवसात हे काम पूर्ण होवून हा विषय मार्गी लागेल. ना. जयंत पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे बरोबर महिन्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. यामध्ये प्रशासक वैभव साबळे यांचे योगदान मोलाचे आहे.
COMMENTS