जळगाव/प्रतिनिधी : राज्यात दररोज केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत. महाविकास आघाडीचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. किमान आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका
जळगाव/प्रतिनिधी : राज्यात दररोज केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे पडत आहेत. महाविकास आघाडीचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. किमान आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा आणि 2-4 भाजप नेत्यांना तुरुंगात पाठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले.
विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शरद पवारदेखील उपस्थित होते. सभेत खडसे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही चांगलेच ताशेरे ओढले. जे एकेकाळी माझे पाय धरायचे. माझा आशीर्वाद घ्यायचे, ते आज माझ्याविरोधात आणि शरद पवारांविरोधात बोलत आहेत, अशा शब्दांत खडसेंनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. कालच देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 14 ट्वीट करत शरद पवारांवर हिंदुत्वाच्या मुद्यावरून टीका केली होती. याचा संदर्भ देत एकनाथ खडसेंनी फडणवीस यांचा आज समाचार घेतला. राज्यात रोज 100 धाडी पडत आहेत. तपास यंत्रणांचा एवढा गैरवापर कधी पाहिला नव्हता. कुणी चुकीचे केले असेल तर त्याला शिक्षा मिळायला हवी, याबाबत आपले काही म्हणणे नाही. मात्र, तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे, असा आरोप यावेळी खडसे यांनी केला. केवळ आरोप करायचे आणि हे नेतेच मास्टरमाईंड असल्याचे सांगून त्या नेत्याला फसवायचे, कोटी-कोटींचा आकडा जाहीर करायचा, असे प्रकार सध्या राज्यात चालू असल्याचे खडसे म्हणाले. त्यामुळे आता गृहविभागाने आपला हिसका दाखवत किमान 2-4 भाजप नेत्यांना तुरूंगात पाठवावे, असे आवाहन खडसे यांनी केले.
COMMENTS