शिवसेनेला बंडाळी नवी नसली, तरी एकनाथ शिंदे यांची ही बंडाळी शिवसेनेला धडकी भरवणारी, मातोश्रीला हादरवून टाकणारी आहे. राज्यात सत्ताबदल होईल का, मुख्यमंत
शिवसेनेला बंडाळी नवी नसली, तरी एकनाथ शिंदे यांची ही बंडाळी शिवसेनेला धडकी भरवणारी, मातोश्रीला हादरवून टाकणारी आहे. राज्यात सत्ताबदल होईल का, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देतील का, विधानसभा बरखास्त होईल का, याचे उत्तर काही तासात मिळेलच, मात्र यानिमित्ताने शिवसेनेची झालेली वाताहात पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे कसे रोखतील हा महत्वाचा प्रश्न आहे. सत्ता आज आहे, उद्या नसेल, मात्र पक्ष हा कायम असतो. त्याची झालेली वाताहात पुढील काही दशकात भरून येणार नाही. त्यामुळे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे डॅमेज कसे रोखतात, यावर पक्षाची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे शिवसेनेची झालेली वाताहात, यावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त ठरते.
शिवसेनेची स्थापना तशी 1966 मध्ये झाली. तब्बल 56 वर्षांचा पक्ष हा आज फुटीच्या उंबरटयावर असून, शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांच्याकडे 56 पैकी केवळ 17 ते आमदार आहेत. तर शिवसेनेतील दुसरे सत्ताकेंद्र असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 पेक्षा अधिक आमदार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये अनेक शिवसेना आमदारांनी पक्षाला मुंबईला येण्याचे आश्वासन देऊन गुवाहाटीची वाट धरली आहे. त्यामुळे हा आकडा अपक्षांसह 45 ते 50 च्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेजवळ 15 पेक्षा अधिक आमदार असणार नाहीत. त्यामुळे शिंदे एकप्रकारे शिवसेना पक्षच हायजॅक करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. मात्र शिवसेना पक्ष हायजॅक करण्यामागे किंवा शिवसेनेची झालेली वाताहात याला जबाबदार कोण, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मूळातच उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्याभोवती काही चेहरे उभे केले आहेत. त्यांच्या जीवावर उद्धव ठाकरे निर्णय घेतले जात होते. एकतर शिवसेना नेता म्हणवून घेणारे संजय राऊत यांनी कधीही लोकांतून निवडणूक लढवली नाही. किंवा लढवली असती, तरी ते निवडून येण्याची शक्यता नाहीच. तर दुसरीकडे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर शिवसेनेचे दुसरे सत्तास्थान. या दोघांचे ऐकल्याशिवाय उद्धव ठाकरे अलीकडच्या काळात कोणताच निर्णय घेत नव्हते एव्हाना स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे ज्यांना शिवसैनिकांचा जनाधार आहे, जे लोकनेते म्हणून ओळखले जातात, असे एकनाथ शिंदेसह अनेक नेत्यांना ताटकळत ठेवणे, त्यांनी शिवसैनिकांच्या भावना उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवल्यानंतर त्याला दाद न देणे, यामुळे शिवसेनेचे पुढील भवितव्य काय, याबाबत अनेक शंका उपस्थित केले जात होते. विशेष म्हणजे शिवसेनेची स्थापना ज्या हिंदूत्वाच्या बेसवर झाली, ती शिवसेनाच आपला मूळ बेस विसरून, राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँगे्रसमध्ये सहभागी झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा असून देखील शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नव्हता. विकास कामे होत नव्हती. त्यामुळे मुख्यमंत्री आपला असून, जर कामे होत नसेल, तर पक्षाच राहायचेच कशाला, असा विचार पक्षातील आमदारांचा होत होता. आणि त्याला खतपाणी मिळत गेले. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आपण भाजपबरोबर सत्तेत जायला हवे, अशी विनवणी केली होती. मात्र त्या पत्राकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी देखील पक्षाच्या आमदारांची मागणी बोलून दाखवली होती, याकडे उद्धव ठाकरे यांनी दूर्लक्ष केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतांना, त्यांचे चिंरजीव आदित्य ठाकरे यांना कॅबीनेट मंत्रीपद दिले. शिवाय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असूनही, त्यांना त्यांच्या खात्याचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नव्हते. मुख्यमंत्री अनेक वेळेस शिंदे यांच्या फाईल अडवून ठेवत होते. ही होणारी मुस्कटदाबी शिंदे यांच्या सातत्याने जिल्हारी लागत होती. आपण अनेक खस्ता खात, संघर्ष करत पक्ष वाढवला मात्र त्याची फळे चांडाळचौकडी चाखत आहेत. आणि आपल्याभोवती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीबाही भरवले जात आहे. त्यामुळेच त्यांची होणारी कोंडी यातून त्यांनी बंड पुकारल्याचे दिसून येत आहे.
COMMENTS