Homeताज्या बातम्यासंपादकीय

शरद पवारांची राजकीय चाल

राजकारणात कोण-कधी मात देईल सांगता येत नाही, त्यासाठी पक्षनेतृत्वाने नेहमी सजग राहून आपला पक्ष सांभाळण्याचे सध्याचे दिवस आहेत. कारण शिवसेनेची आज ज

सीमाप्रश्‍नांचा वाढता गुंता
ट्रक चालक आणि कायदा
राजकीय मोर्चेबांधणी

राजकारणात कोण-कधी मात देईल सांगता येत नाही, त्यासाठी पक्षनेतृत्वाने नेहमी सजग राहून आपला पक्ष सांभाळण्याचे सध्याचे दिवस आहेत. कारण शिवसेनेची आज जी पुरती वाताहात झाली आहे, त्यामुळे इतर प्रादेशिक पक्ष जर जपून पावले टाकतांना दिसून येत आहे. शिवसेनेसारखीच वेळ राष्ट्रवादी काँगे्रसवर आली असतांना, शरद पवार ज्या पद्धतीने राजकीय चाली खेळत आहेत, यावरून ते भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत दिसून येत आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे शरद पवारांनी नुकतेच केलेले विधान. अजित पवार आमचेच असल्याचे केलेले विधान. शरद पवारांच्या विधानापूर्वी सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते असल्याचे म्हटले होते. त्यामुळे शरद पवारांकडून जो काही संभ्रम निर्माण केला जात आहे, त्यामागे बरेच मोठे नियोजन असल्याचे दिसून येत आहे. आणि यामध्ये शरद पवार अजित पवारांचा पुन्हा एकदा प्यादासारखा वापर करून घेत असल्याचे दिसून येत आहे. खरंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये सुप्त संघर्ष कुठेही नाही. कारण ज्यादिवशी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याचदिवशी शरद पवारांची तळपायाची आग मस्तकाला जायला हवी होती. मात्र त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार निवांत दिसले. त्यांच्या चेहर्‍यावर कुठलाही ताण, चिंता दिसून आली नाही. याउलट पवार शांत दिसले. या पत्रकार परिषदेत त्यांचा त्रागा, आक्रस्ताळेपणा कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे शरद पवार शिवसेनेची जी अवस्था झाली ती, राष्ट्रवादीची होवू देणार नाही, हे तेव्हाच पटले होते. शरद पवार शेवटच्या क्षणापर्यंत मैदातून पळ काढत नाही, शेवटच्या क्षणी आपण जिंकू शकतो, असा आत्मविश्‍वास शरद पवारांना असल्यामुळेेच शरद पवारांनी काही राजकीय चाली खेळल्या आहेत, त्या यशस्वी होतांना दिसून येत आहे. त्यामुळे या चाली काय होत्या, याचा उलगडा होईपर्यंत 2024 ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक संपलेली असेल आणि महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झालेले असेल. आपल्या मनात काय चालले आहे, याचा थांगपत्ता समोरच्याला लागू नये, यासाठी शरद पवार काही वेगळ्या राजकीय चाली खेळतात. आपण जे बोलणार आहोत ते करायचे नाही, त्यापेक्षा वेगळेच करायचे हा पवारांचा राजकीय सिद्धांत. त्यामुळे आपण जे बोलते, त्याचा विचार करण्यात आपले विरोधक वेळ घालवत असतील, चिंतन, मनन करत असतील, तेव्हा आपण दुसरा डाव खेळून मोकळे व्हायचे हा पवारांचा राजकीय सिद्धांत आहे. तो राजकारणांत नेहमीच पाळला आहे. त्यामुळे पवार विश्‍वासू नाहीत, त्यांची राजकीय विश्‍वासार्हता संपली असे विरोधक म्हणत असले तरी, पवारांनी आपले राजकीय स्थान अशा खेळांमुळे पक्के केले आहे. राज्यात भाजप जरा खुशीत असेल, कारण त्यांना माहीत असेल की, राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस फोडल्यामुळे आपल्यासमोर सक्षम असा विरोधी पक्ष राहिलेला नाही. मात्र अजित पवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपसोबत राहील का, हा मोठा प्रश्‍न आहे. जर अजित पवारांना मुख्यमंत्री पद मिळणार असेल तर, शरद पवार अजून काही काळ प्रतीक्षा करतील, अन्यथा अजित पवारांची घरवापसी ठरलेली आहे. यामागे अनेक व्यूहरचना पवारांनी खेळलेल्या आहेत, ज्याचा भाजप अंदाज देखील घेवू शकत नाही. एकतर या खेळीने शरद पवारांनी अजित पवारांना सुरक्षित केले आहे. ईडीची टांगती तलवार अजित पवारांच्या डोक्यावर कायम असलेली ही टांगती तलवार पवारांनी हटवली आहे. शिवाय राष्ट्रवादीतील काही सहकारी जसे की, हसन मुश्रीफ, अजित पवार, यासारख्या अनेक नेत्यांना ईडीमुळे तुरुंगात जाण्याची वेळ आलेली होती, ती यानिमित्ताने टळली आहे. शिवाय यामुळे सत्तेत वाटा मिळाल्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि जर घरवापसी करावीच लागली तर, शरद पवारांवर खापर फोडून अजित पवार भाजपशी चांगले संबंध ठेवू शकतात. कारण अजित पवार आपल्याला भविष्यात उपयोगी येईल, याच महत्वाकांक्षेपायी भाजपने अजित पवारांवर ईडीची कारवाई करण्याची हिंमत अजूनतरी दाखवलेली नाही. मात्र हा खेळ शरद पवारच खल्लास करतील, तेव्हा भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली असेल, असेच यातून दिसून येत आहे. कारण शरद पवारांना जर भाजपसोबत जायचे असते तर, ते आत्ताच गेले असते. शिवाय आणखी मंत्रिपदे पदरात पाडून घेता आली असती, मात्र पवारांनी हा सर्व खेळ बाजूला ठेवून नवी चाल खेळली आहे. ज्यामुळे कार्यकर्ते जसे संभ्रमात आहे, त्याचप्रकारे भाजपही संभ्रमात आहेत.

COMMENTS