भारतीय वंशाचे ऋषी सूनक बनले इंग्लंडचे पंतप्रधान

Homeताज्या बातम्याविदेश

भारतीय वंशाचे ऋषी सूनक बनले इंग्लंडचे पंतप्रधान

ज्या गोऱ्या साहेबांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले त्याच गोऱ्या साहेबांच्या देशात म्हणजे इंग्लंडमध्ये भारतीय वंशाचा व्यक्ती पंतप्रधान बनला आहे. भारत

उन्नाव बलात्कार पीडितेची आई लढणार निवडणूक | DAINIK LOKMNTHAN
सातारा – जिल्ह्यात पुन्हा सहा बाधितांचा मृत्यू (Video)
माण तालुक्यात सिलेंडरचा स्फोट; संसारोपयोगी साहित्य जळून खाक

ज्या गोऱ्या साहेबांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य केले त्याच गोऱ्या साहेबांच्या देशात म्हणजे इंग्लंडमध्ये भारतीय वंशाचा व्यक्ती पंतप्रधान बनला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात हा योग जुळून आला आहे हे विशेष! इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्यानंतर झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीतच भारतीय वंशाचे ऋषी सूनक हे पंतप्रधान बनतील अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. सुरवातीच्या फेरीत ऋषी सूनक यांनी मोठी आघाडी घेतली होती मात्र शेवटच्या फेरीत ते पिछाडीकर पडल्याने लिस ट्रस यांची इंग्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली. मात्र अवघ्या ४५ दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला. इंग्लंडच्या इतिहासात लिस ट्रस सर्वात कमी काळ पंतप्रधान राहिल्या. लिस ट्रस यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोठमोठ्या बाता मारून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे इंग्लंडच्या बाजाराला धक्के बसले. ब्रिटनचा पौंड गडगडला. प्रचंड महागाई व आर्थिक संकटात इंग्लंड आचके देऊ लागला त्यामुळे जनतेची त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली. इंग्लंडची  धोक्यात आलेली अर्थव्यवस्था सावरू शकत नाही हे लक्षात येताच लिस ट्रस यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर ऋषी सूनक हे इंग्लंडचे नवे पंतप्रधान होतील हे निश्चित झाले.  सोमवारी हुजूर पक्षाच्या संसदीय दलाने ऋषी सूनक यांची नेता म्हणून निवड केली. सूनक यांना २०० खासदारांचा पाठिंबा मिळाला तर प्रतिस्पर्धी पेनी मोरडोन्ट यांना केवळ २६ खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने ऋषी सूनक हे इंग्लंडचे नवे पंतप्रधान होतील हे स्पष्ट झाले. २८ ऑक्टोबर रोजी ऋषी सूनक हे पंतप्रधानपदाची शपथ घेतील तर २९ ऑक्टोबर रोजी आपल्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा करतील. आयटीव्हीचे राजकीय संपादक रॉबर्ट पेस्टन यांनी हा क्षण ब्रिटिश इतिहासातील अत्यंत महत्वाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात हुजूर पक्षाचे खासदार ब्रिटिश भारतीयाची त्यांचा नेता आणि देशाचा पंतप्रधान म्हणून निवड करतात हा ब्रिटिश इतिहासातील ऐतिहासिक असा क्षण आहे. २८ ऑक्टोबरला जेंव्हा ऋषी सूनक इंग्लंड चे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील तेंव्हा इंग्लंडमध्येच नव्हे तर भारतामध्येही फटाके फुटतील कारण ते इंग्लंडमधील  भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान बनतील. भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना मूळ भारतीय असलेल्या व्यक्तीला गोऱ्या साहेबांवर राज्य करण्याची संधी मिळेल. भारतीयांसाठी देखील ही अभिमानाची बाब असेल. इंग्लंडमध्ये जन्मलेले ऋषी सूनक हे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ते सुरवातीला ज्युनिअर मंत्री होते. २०१८ मध्ये त्यांची इंग्लंडच्या निवास मंत्री म्हणून निवड झाली. एक कर्तबगार मंत्री म्हणून त्यांची गणना होते. आपल्या कर्तृत्वाची मोहर त्यांनी  मंत्रीपदावर उमटवल्यामुळे त्यांची इंग्लंडच्या अर्थमंत्रीपदी नेमणूक करण्यात आली. इंग्लंडमध्ये अर्थमंत्री हे पंतप्रधान खालोखाल महत्वाचे मानले जाणारे पद आहे. अर्थमंत्री म्हणूनही त्यांची कारकीर्द उत्कृष्ट अशीच राहिली. ऋषी सूनक यांचे आई वडील त्यांच्या  आजी आजोबांसोबत इंग्लंडला गेले व तेथेच स्थायिक झाले. ऋषी सूनक यांचे वडील इंग्लंडमधील प्रसिद्ध डॉक्टर होते तर आई  फार्मसीचा व्यवसाय चालवायच्या. त्यांच्या पत्नी अक्षता इम्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत. १९८० साली हॅम्पशायर येथील साऊथ हंप्टन येथे त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण  पूर्ण झाल्यावर त्यांनी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. काही काळ व्यवसाय केल्यावर ते राजकारणात उतरले आणि पहिल्याच प्रयत्नात ते खासदार बनले आणि आता इंग्लंडचे पंतप्रधान. अवघ्या ४२ व्या वर्षी इंग्लंडचे पंतप्रधान होणारे ऋषी सूनक हे गेल्या २०० वर्षातील इंग्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. ऋषी सूनक हे अर्थशास्त्राचे विद्यार्थी असून त्यांनी अर्थमंत्री असताना उत्कृष्ट कार्य केल्यामुळे ते इंग्लंडची बिघडलेली अर्थव्यवस्था सुधारतील असा विश्वास इंग्लंडमधील जनतेला आहे. ज्या गोऱ्या साहेबांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्याच गोऱ्या साहेबांवर आता ते राज्य करणार आहेत याचा भारतीय नागरिकांना अभिमान आहे. ऋषी सूनक यांचे अभिनंदन!   

COMMENTS