रेखा जरे हत्याकांडाची लवकरच नियमित सुनावणी…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांडाची लवकरच नियमित सुनावणी…

आधी होणार आरोप निश्‍चिती, आरोपींच्या जामीन अर्ज निकालाची प्रतीक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला आज मंगळवारी (30 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. मागील वर्षभरात या ख

विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान ह सेवेचे, प्रबोधनाचे ज्ञानतीर्थ ः शिवाजीराव कपाळे
अविकासाच्या अपप्रवृत्तींचा नाशासाठी खड्डे रूपी रावणाचे दहन
राजरत्न आंबेडकरांनी वैचारिक वारसा जपला ः आ. काळे

अहमदनगर/प्रतिनिधी : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येला आज मंगळवारी (30 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे. मागील वर्षभरात या खुनाच्या घटनेच्या अनुषंगाने अनेक घटना घडल्या आहेत. दोन आरोपपत्रेही न्यायालयात दाखल झाली आहेत. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्यासह 11 आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची (चार्ज फ्रेम) प्रक्रिया होणार असून, ती झाल्यावर या खून खटल्याची न्यायालयात नियमित सुनावणी होणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सागर भिंगारदिवे व बाळ बोठे यांनी अनुक्रमे जिल्हा न्यायालय व औरंगाबाद खंडपीठात जामीनासाठी अर्ज केले असल्याने त्याच्या निकालानंतर जरे खून खटल्याची आरोप निश्‍चिती होऊन नियमित सुनावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
मागील वर्षी 30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची हत्या झाली. त्या मुलगा, आई व मैत्रिणीसह पुण्याहून नगरला येत असताना दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोनजणांनी त्यांना गाडी आडवी घातली व त्यांच्याशी वाद घालत असताना धारदार चाकूने त्यांचा गळा चिरला. यावेळी वाद सुरू असताना जरे यांच्या मुलाने या दोघांपैकी एकाचा फोटो मोबाईलमध्ये काढला असल्याने त्याआधारे पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध घेतला. खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोन दिवसातच ज्ञानेश्‍वर उर्फ गुड्डू शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहुरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे व ऋषिकेश पवार (नगर) या 5 आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीतून जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार दैनिक सकाळचा तत्कालीन निवासी संपादक व पत्रकार बाळ ज. बोठे असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी 3 डिसेंबरला जाहीर केले. त्यानंतर मात्र बोठे फरार झाल्याने त्याचा शोध राज्यात व देशभरात घेतला गेला. तब्बल 102 दिवसांनंतर बाळ जगन्नाथ बोठे याला हैदराबाद येथे अटक केली होती. या घटनेचा मास्टर माईंड पत्रकार बोठे हा या घटनेतील मुख्य आरोपी असून तो घटना झाल्यापासून तीन महिने फरार होता. हैदराबाद येथे तो असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांनी त्याच्या शोधासाठी विविध पथके पाठवली होती. या पथकाने 12 मार्च 2021 रोजी बोठे याच्यासह चार जणांना हैदराबाद येथे अटक केली होती. त्यावेळी बोठेला फरार होण्यास मदत करणार्‍या आरोपींमध्ये जनार्दन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अंजय चाकाली (वय 25, रा. गुडुर करीमनगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय 30, रा. बालापुर, सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय 52, रा. चारमीनार मस्जीद, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली. तसेच पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैद्राबाद) या महिलेचाही त्यामध्ये समावेश होता. याच वेळी नगरमधून महेश तनपुरे यालाही बोठेला मदत केल्याबद्दल पकडण्यात आले होते. जरे यांच्या खून प्रकरणात एकूण 11 आरोपी असून, यात प्रत्यक्ष खुनात सहाजण व फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणारे 5जण आहेत.

दोघांच्या जामीनाची उत्सुकता
जरे यांच्या हत्येनंतर बोठे विरोधात विनयभंग व खंडणीचे असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. तो फरार असतानाच्या काळात त्याचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले गेले होते. तर त्याच्या संपत्तीची चौकशी करावी व अन्य मागण्यांसाठी पोलिसांसह राज्य सरकारला निवेदनेही पाठवली गेली आहेत. मागील वर्षभरापासून जरे हत्याकांड प्रकरण राज्यच नव्हे तर देशभरातील माध्यम जगतात गाजत आहे. खून प्रकरणातील साक्षीदारांना धमकी, फिर्यादीवर दबाव व आमीष, पोलिस संरक्षणाची मागणी, पारनेरच्या कारागृहात असताना बोठेकडून मोबाईलाचा झालेला वापर अशा अनेकविध घटनांतून हे प्रकरण गाजत राहिले. या प्रकरणातील एक आरोपी ऋषिकेश पवार याने केलेला जामीनासाठीचा अर्ज फेटाळला गेला आहे. आता सागर भिंगादिवे याने जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. तर मुख्य आरोपी बाळ बोठे याचा जामीनासाठीचा अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. तेथे येत्या 2 डिसेंबरला त्यावर सुनावणी होणार आहे. भिंगारदिवेच्या जिल्हा न्यायालयात दाखल जामीन अर्जावर पोलिस व सरकारी वकिलांनी म्हणणे मांडले आहे. त्याची सुनावणी बाकी आहे. याशिवाय बोठेच्या मुलाने बोठेचा पोलिसांनी जप्त केलेला आयफोन मिळावा म्हणून तसेच त्याची जप्त केलेली दुचाकीही मिळावी म्हणून न्यायालयात अर्ज केला आहे. त्याचीही सुनावणी अजून झालेली नाही. याशिवाय बोठेने औरंगाबाद खंडपीठात जामीन मिळण्यासाठी अर्ज करताना त्याच्याविरुद्ध दाखल असलेली खंडणीची फिर्याद (गुन्हा) रद्द होण्यासाठीही अर्ज केला असून, त्याचीही अजून सुनावणी झालेली नाही.

डिसेंबरमध्ये अपेक्षित
जरे हत्याकांडातील आरोपी भिंगारदिवे याच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालयात तर बोठेच्या जामीन अर्जावर 2 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. या दोन्ही जामीन अर्जांवरील सुनावणीच्या निकालानंतर जरे हत्याकांडातील आरोपींविरुद्ध आरोप निश्‍चितीची प्रक्रिया होणार आहे व त्यानंतर जरे हत्याकांड खटल्याची नियमित सुनावणी होणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात ही सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. यादव पाटील काम पाहत आहेत. त्यांना जरे कुटुंबाचे वकील अ‍ॅड. सचिन पटेकर मदत करीत आहेत.

COMMENTS