Homeताज्या बातम्यासंपादकीय

कर्नाटक भाजपमधील बंडाळी

कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून, या राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. येदियुरप्पा यांना डावलून भाजपने बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदी ब

तापमानवाढ आणि वाढते प्रदूषण !
जागावाटपाचा गुंता
 महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल

कर्नाटक राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत असून, या राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. येदियुरप्पा यांना डावलून भाजपने बोम्मई यांना मुख्यमंत्रीपदी बसवले आणि भाजपची घसरण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक राज्यात नेहमीच पंचवार्षिक निवडणुकांच्यावेळी सत्ताबदल होतांना दिसून येत आहे. गेल्यावेळी देखील काँगे्रसने जेडीएसच्या मदतीने सत्ता स्थापन केली होती. मात्र भाजपने जनता दल पक्षातील 17 आमदार फोडून भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. मात्र गेल्या अलीकडच्या काही वर्षांपासून कर्नाटक भाजपमध्ये अंसतोष वाढतांना दिसून येत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे वरिष्ठ नेत्यांना डावलण्याचे. येदियुरप्पा यांना डावलल्यानंतर येदियुरप्पा काहीतरी भूमिका घेतील अशी अपेक्षा होती. मात्र येदियुरप्पा यांनी आपले पानीपत करून घेण्याऐवजी शांत राहण्याची भूमिकाच घेतली. मात्र त्यानंतर आलेल्या बसवराज बोम्मई यांना मात्र आपली पकड निर्माण करता आलेली नाही. भाजपमधील अनेक महत्वाकांक्षी नेत्यांना मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडू लागले आणि त्यातून सत्तासंघर्षाचा खेळ सुरू झाला. भाजपने जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आणि भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी नाराजीनाट्य सुरू केले. त्यात माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामासत्र बाहेर काढले आहे. त्यामुळे भाजपला ही बंडाळी थोपवण्याची गरज आहे.

भाजपच्या पहिल्या यादीत 189 उमेदवारांच्या यादीमध्ये 52 नवीन चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे.  मात्र नाराजी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत पक्ष सोडल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तसेच कर्नाटकचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या नाराजीची बातमीही समोर आली आहे. कारण त्यांनाही पक्षाने उमेदवारी दिली नाही. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी शेट्टर दिल्लीत पोहोचले आहेत. कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यामुळे भाजपला ही बंडाळी थोपवावी लागेल, अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. मतदानापूर्वीच आलेल्या मतदानोत्तर चाचण्यामध्ये काँगे्रसला सत्ता मिळण्याचे संकेत मिळत आहे. दक्षिणेकडील कर्नाटक सर्वात मोठे राज्य आहे. तामिळनाडूमध्ये जर भाजपला प्रवेश करायचा असेल, तर कर्नाटक भाजपच्या हाती असायला हवे. मात्र कर्नाटक जर भाजपच्या हातातून निसटले तर, भाजपचे दक्षिणेत वर्चस्व प्रस्थापित करण्याचे मनसुबे धुळीस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने ही बंडाळी मोडीत काढण्याची गरज आहे. शिवाय कर्नाटकमध्ये ज्यांचा करिश्मा चालेल असा नेता नाही. येदियुरप्पा सोडले तर, भाजपमध्ये स्थानिक पातळीवर बंड मोडून काढेल, प्रचारात आघाडी घेईल असे नेते नाहीत. त्यामुळे भाजपची सर्व भिस्त ही पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते अमित शहा या दोन नेत्यांवर राहील, यात शंका नाही. तसेच कर्नाटक विधानसभेचा विजय हा लोकसभेसाठी सर्वच पक्षांचे मनोबल उंचावणारा असेल. त्यामुळे कर्नाटक विधानसभा जो पक्ष जिंकेल, त्या पक्षाचा लोकसभेसाठी आत्मविश्‍वास उंचावलेला असेल. दुसरीकडे काँगे्रसमध्ये स्थानिक पातळीवर सिद्धरामय्या आणि काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार यांचे मोठे प्राबल्य आहे. या नेत्यांची स्थानिक पातळीवर मोठी पकड असून, काँगे्रसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देखील कर्नाटकातून येतात. शिवाय राहूल गांधी यांच्या होणार्‍या सभा, त्यांची रद्द झालेली खासदारकी, असे अनेक मुद्दे या निवडणुकीत गाजण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कर्नाटकची रणधुमाळी ही लोकसभेची नांदी ठरणार आहे. 

COMMENTS