मुंबई: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावेळी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ रविवारी मुंबईत काढण्यात
मुंबई: वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावेळी झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ रविवारी मुंबईत काढण्यात येणाऱ्या तिरंगा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. हा मोर्चा शांततापूर्ण आणि पक्षीय रंगापासून दूर ठेवण्याचे निर्देश देतानाच, गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मोर्चाच्या नियोजनासाठी शनिवारी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी शहराध्यक्ष, विभागप्रमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोर्चाचे नियोजन, शिस्त आणि सुरक्षेशी संबंधित सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राज ठाकरे यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात सांगितले की, हा तिरंगा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र ठामपणे उभा असल्याचा संदेश या मोर्चातून दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
हा मोर्चा पूर्णपणे अराजकीय स्वरूपाचा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज, पक्षीय घोषणा किंवा नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून केवळ त्यांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या विरोधातील निषेधाच्या घोषणा दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करताना राज ठाकरे यांनी निर्देश दिले की, मोर्चात गोंधळ घालण्याचा किंवा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित व्यक्तींना तात्काळ पोलिसांच्या ताब्यात द्यावे. तसेच महिला, विद्यार्थिनी आणि पालकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

COMMENTS