Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात पावसाचा कहर

बिलोलीत वाहतूक ठप्प झाल्यामुळे शेकडो विद्यार्थी अडकले शाळेत

बिलोली प्रतिनिधी - सगरोळी (ता. बिलोली) परिसरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने रुद्रावतार दाखविला असून, झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागातील

राज्यात पावसाची दमदार हजेरी
राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता
हैदराबादमध्ये पावसाचा धुमाकूळ

बिलोली प्रतिनिधी – सगरोळी (ता. बिलोली) परिसरात दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने रुद्रावतार दाखविला असून, झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागातील शेतीला नदीचे स्वरूप आले आहे.
सगरोळी व आदमपूर (ता. बिलोली) येथील नाल्यालगतची शेकडो एकर जमीन पाण्याखाली आल्याने संपूर्ण पिक खरडून वाहून गेले आहे. ह्या अतिवृष्टीमुळे मुग, उडीद, सोयाबीन व तुरीचे आलेले मोड वाहून गेले असून, शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने सगरोळी ते बिलोली हा रस्ता बंद झाल्याने अनेक वाहनधारक अडकून पडले. केरूर, आदमपूर, थडीसावळी, खतगाव या गावाच्या शिवारातून जाणारा नाला अनेक ठिकाणी फुटल्याने नाल्यातील पाण्याने शेकडो एकर जमीन आपल्या कव्हेत घेतली. मूतन्याळ, मिनकी, केसराळी या शिवारातील नाल्यालगत असलेल्या जमिनीची अशीच परिस्थिती आहे. पाच तासांच्या अतिवृष्टीमुळे पाहता पाहता नाल्याचे नदीत रुपांतर झाले. पिकांचे नुकसान झाले असल्याने प्रशासनाने त्वरित पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत. शेतकर्‍यांना ह्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. बिलोलीत विद्यार्थी शाळेत अडकले बिलोली- शहरासह तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला. तीन ते चार तास झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरी भागाला जोडणारे अनेक रस्ते जाम झाले. ज्यामुळे शहरातील मराठी व इंग्रजी माध्यमातील शाळेत शेकडो विद्यार्थी उशीरापर्यंत अडकून पडले होते. बिलोली शहराच्या गल्लीबोळीपासून अनेक रस्ते खरडून निघाले. पावसाचा जोर एवढा होता की दोन तासातच बडूर, लघुळ, सावळी, चिंचाळा, कासराळी, भोसी, बेळकोणी, कोंडलापूर, बावलगाव आदी मार्गावरील नाले तुडुंब भरल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडली. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरातील शाळेत जातात. शहरालगत असलेल्या सावळी रोडवर एक किलोमीटर रस्त्यावर पाणी वाहिल्याने या मार्गावरील लिटल फ्लॉवर शाळेत शेकडो विद्यार्थी अडकले होते. सावळी येथील 25 विद्यार्थी पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालयात पाठविण्यात आले होते. बडूर मार्गावरील विद्यार्थी पोखर्णी फाट्याजवळ उशिरापर्यंत थांबून होते. पावसामुळे दाणादाण उडाली असून चिंचाळा फाट्याजवळ एक दुचाकीस्वार वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे.

COMMENTS