टिम इंडिया भल्या मोठया दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत डेरेदाखल झाली. आयसीसी मानांकनातील सर्वोत्तम संघ अशी बिरुदावली घेऊन प्रोटियाजमध्ये पाऊल ठेवताच ट
टिम इंडिया भल्या मोठया दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत डेरेदाखल झाली. आयसीसी मानांकनातील सर्वोत्तम संघ अशी बिरुदावली घेऊन प्रोटियाजमध्ये पाऊल ठेवताच टिम इंडियाची शुक्लकाष्टांनी सुरुवात केली. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी वनडे, टि२० व कसोटी सामन्यांसाठी तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या व उपकर्णधारांच्या नेतृत्वाखाली ३२ खेळाडू सफारी दौऱ्यावर पाठविले आहे. अर्थात गुरू राहुल द्रविड व त्याचा सहाय्यक चमू दिमतीला आहेच. या भरगच्च दौऱ्याची सुरुवात दहा डिसेंबरला डरबनमध्ये झाली आणि तेथे दस्तुरखुद्द वरूणराजानेच टिम इंडियाचे जोरदार स्वागत करून पहिला टि२० सामना स्वतः गिळंकृत केला. त्यानंतर बारा डिसेंबरला गकेबरहाच्या सेंट जॉर्ज पार्कवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टिम इंडियाच्या डावाच्या शेवटच्या हाणामारीच्या प्रसंगी चक्क दक्षिण आफ्रिकेच्या मदतीस धावला. ते शेवटचे तीन चेंडू व्यवस्थित रिंकू सिंग खेळला असता तर टिम इंडियाचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असता. मात्र येथे नियतीच भारतीय संघावर रुसली होती. त्यानंतर वरूण राजाने फक्त आणि फक्त दक्षिण आफ्रिकन संघालाच फायदा होईल अशी परिस्थिती निर्माण केली.
पावसाच्या व्यत्ययामुळे नियोजित वेळेत सामना पूर्ण होणे शक्य नसल्याने पंच मंडळाला काही षटके कमी करावे लागले व विजयासाठीचे लक्ष दक्षिण आफ्रिकेसाठी अगदी सोपे व आवाकयातले ठरले. डिएलएस प्रणालीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच मोठा लाभ दक्षिण आफ्रिकेला मिळाला आणि मालिकेत आघाडीवर जाण्याची संधीही ! तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाला प्रथम फलंदाजीचा पाहुणचार घेण्यास सांगितले. मात्र मार्करमचे आदरतिथ्य भारताच्या आघाडीवीरांना पचले नाही. सन २०१६ मध्ये पाकिस्तान विरूध्द भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व अजिंक्य राहाणे शुन्याचे धनी बनले होते. त्या नकोस्या क्लबमध्ये सामील होऊन यशस्वी जयस्वाल व शुभमन गिलने टिम इंडियाला अडचणीत टाकले व स्वतःही पुढच्या सामन्यात संघाबाहेर असतील याची दक्षता घेतली.
दोन बाद सहावरून प्रथम तिलक वर्मा (२९) व कर्णधार सुर्यकुमार यादव (५६) यांनी संघाचा डोलारा सांभाळला. त्यांच्यानंतर नवोदित रिंकू सिंगने टि२०तील स्वतःचे पहिले अर्धशतक ( नाबाद ६८ धावा ) ठोकून संघाला ७ बाद १८० अशा सुस्थितीत पोहचविले, व आणखी तीन चेंडू शिल्लक असताना मैदानात पावसाने आक्रमण केले व शेवटचे तीन चेंडू मैदानाबाहेर पिटाळून टिम इंडियाला दोनशेच्या आसपास नेण्याचे त्याचे मनसुबे अक्षरशः उधळून लावले. त्यानंतर डिएलएस नियमामुळे द.आफ्रिकेला मिळालेले आव्हान अगदी सोपे होते.
पंधरा षटकात एकशे बावन्न धावांचे लक्ष द. आफ्रिकेने १३.५ षटकात पाच बाद १५४ धावा करून लिलया पार केले. ७ चेंडू व पाच गडी राखून मिळविलेला विजय हा टि२० मध्ये मोठा विजय समजला जातो. त्याचा मनोवैज्ञानिक लाभ द. आफ्रिकेला पुढच्या सामन्यांमध्ये न झाल्यासच आश्चर्य ठरेल.
स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली पूर्ण क्षमतेनिशी मैदानात उतरलेली दक्षिण आफ्रिकेची फलंदाजांची झुंड टिम इंडियाच्या गोलंदाजांवर अक्षरशः बरसली. नियमित अंतराने गडी बाद होत असले तरी आफ्रिकन फलंदाजांनी धावगती अखेरपर्यंत हाताबाहेर जाऊ दिली नाही. रीझा हेंड्रिक्स २७ चेंडूत ४९, कर्णधार मार्करम १७ चेंडूत ३०, डेव्हिड मिलर १७, मॅथ्यू ब्रीटजके १६, ट्रिस्टन स्टब्स नाबाद १४, व एंडिले फेहलुकवायोने नाबाद दहा धावांचे योगदान देऊन भारताचे आव्हान रविंद्र जडेजाला षटकार ठोकून पार केले. अतिआक्रमक फलंदाज हेनरिच क्लासेन केवळ सात धावांवर परतल्याने टिम इंडियाला हायसे वाटले पण दक्षिण आफ्रिकेच्या इतर फलंदाजांनी त्याच्या अपयशाची भरपाई करून संघाला विजयी केले. भारताकडून मुकेश कुमारने दोन तर मोहम्मद सिराज व कुलदिप यादवला प्रत्येकी एक बळी मिळाला.
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदिपसिंग व मोहम्मद सिराजने सुरुवातीलाच धावांची खिरापत वाटून संघापुढील अडचणी वाढवून ठेवल्या.
कर्णधार म्हणून सुर्यकुमार यादवची ही दुसरी व परदेशातील पहिलीच मालिका आहे. फलंदाज म्हणून त्याने महत्वाच्या क्षणी संघाला सावरले. मात्र क्षेत्ररक्षणा दरम्यान कर्णधार म्हणून त्याच्यातील उणीवा उघड्या पडल्या. गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षण लावण्यात चुका व पाचही प्रमुख गोलंदाज प्रभावी ठरत नसताना पार्ट टाईम गोलंदाज तिलक वर्माला गोलंदाजी न देणे संघासाठी घातक ठरले. भले येथे वर्माही फेल गेला असता मात्र त्याच्यातील गोलंदाजांला संधी मिळून चुका सुधारण्यास वाव मिळाला असता. परंतु सुर्याने कोणता प्लॅन केला होता हे त्यालाच ठाऊक ? अर्शदिपसिंगकडून मोठ्या अपेक्षा असताना वारंवार मिळणाऱ्या संधीची तो माती करत असून ही बाब स्वतः अर्शदिप व टिम इंडियासाठी मारक ठरत आहे. रविंद्र जडेजाही टि२० चे कौशल्य गमावत असल्याचे निदर्शनास येत असून त्याचा पूर्वीचा जोश आता मात्र फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात ओसरल्याचे विदारक दृश्य दिसत आहे. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याने या मालिकेसाठी बीसीआयने त्याला उपकर्णधार नेमले ही मोठी चुकच वाटायला लागली आहे. तर यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माला आपली उपयुक्तता सातत्याने सिद्ध केलेल्या ईशान किशनला डावलून संधी दिली जात आहे. हा भविष्यातील संघ बांधणीचा भाग असला तरी जितेश मिळालेल्या संधी दवडत आहे. हि बाब चिंता वाढवणारी आहे. या सामन्यात फलंदाजीत केवळ एकच धाव व यष्टीरक्षणात झेल सोडणे, यष्टीचितच्या संधी गमावणे, धावबाद न करणे, डिआरएससंदर्भात योग्य अंदाज न घेणे, बाईजच्या धावा प्रतिपक्षास बहाल करणं या गंभीर चुका त्याच्याकडून घडल्या. कदाचित तो नवोदित व अननुभवी असल्यामुळे असे होतही असेल. परंतु छोटीसी चुक संघाला पराभवाच्या खाईत ढकलत असते. तेंव्हा जितेश, सुर्या व द्रविड यांनी या बाबीकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. हि द्विपक्षीय मालिका असल्याने त्याकडे फारसे गांभीर्याने बघितले जात नसेल पण भविष्यासाठी त्या चुका घातक ठरू शकतात.
मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी चौदा डिसेंबर रोजी होणार असून हा सामना पावसामुळे झाला नाही अथवा द. आफ्रिका जिंकले तर मालिका त्यांच्या खिशात जाईल. टिम इंडियाला स्वतःची इज्जत व पुढील दौऱ्यासाठी आत्मविश्वास टिकवून ठेवायचा असेल तर हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. अन्यथा संपूर्ण दौऱ्यात असेच चित्र दिसेल. तेंव्हा टिम इंडियाने स्वतःला सावरून विजयीपथावर तातडीने परतणे गरजेचे आहे.
COMMENTS