चलचित्र विहीन काळात भारतीय कानसेन ज्या आवाजाची प्रतिक्षा करित आणि दर बुधवारी रात्री आठ वाजता एकाच रेडीओ भोवती कित्येकांचा घोळका जमून 'बीना का गीत
चलचित्र विहीन काळात भारतीय कानसेन ज्या आवाजाची प्रतिक्षा करित आणि दर बुधवारी रात्री आठ वाजता एकाच रेडीओ भोवती कित्येकांचा घोळका जमून ‘बीना का गीतमाला’ आणि नंतर ‘सिबा का गीतमाला’ या कार्यक्रमाचा आनंद घेत. त्याकाळी गाव असो की शहर या कार्यक्रमाची लोकप्रियता तुफान होती; अन् त्याचं नेमकं रहस्य होतं उद्घोषकाचा आवाज! जो आवाज याच आठवड्यात कायमचा विसावला! तो आवाज होता अमीन सयानी यांचा. अर्ध्या लाखापेक्षा अधिक रेडीओ कार्यक्रमांना आवाज देणारे अमीन सयानी यांच्या जादूई आवाजाचे करोडो दिवाने असणारा तो काळ! सुरूवातीलाच ‘बहनों और भाईयों ‘ या संबोधनाने सुरू होणारा अमीन सयानी यांचा आवाज आजही लाखो उद्घोषकांसाठी अनुकरणीय राहीला आहे. काहीसा अनुनासिक असणारा त्यांचा आवाज उर्दू आणि हिंदीवर प्रभुत्व राखून होता. संध्याकाळी एखाद्या टेकडीवर फिरायला जावं आणि हवेचा मंद झुळूक अंगाला स्पर्श करित यावा तसा त्यांचा आवाज श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेई. आज आपण चलचित्र वाहिन्यांच्या विश्वात वावरतो. परंतु, ज्या काळात रेडिओ सिलोन आणि विविध भारती हेच रेडिओ केंद्र भारतातील श्रोत्यांना मनोरंजनासाठी होती. या केंद्रातून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांना अमीन सयानी त्यांच्या आवाज आणि शब्दांच्या उच्चारांनी जीवंत दृश्य उभे करित.
आवाजाच्या भांडवलावर ते या देशातील सेलिब्रिटींच्या रांगेत जाऊन बसले. तसं, त्यांच्या घराचे वातावरण स्वातंत्र्य चळवळीचे होते. स्वतः त्यांच्या कुलसूम सयानी या ‘रहबर’ हे नियतकालिक चालवत. १९४५ ते १९६० असे १५ वर्षे सलगपणे त्यांनी हे नियतकालिक चालवले होते. सयानी यांनी त्यांची आई ‘कुलसुम सयानी’ यांनी महात्मा गांधींच्या सूचनेनुसार नव-साक्षरांसाठी पाक्षिक जर्नल संपादित, प्रकाशित आणि छापण्यात मदत केली. त्यांचे ‘रहबर’ हे पाक्षिक एकाच वेळी देवनागरी हिंदी, उर्दू आणि गुजराती अशा तीन भाषांत प्रकाशित होई. गुजराती मुस्लिम परिवार. स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत राहिलेला गांधीवादी परिवार, असा त्यांच्या परिवाराचा उल्लेख करावा लागेल. अमीन सयानी हे सर्वसामान्य समाज समुहात वावरले नसले तरी त्यांनी रस्त्यावरच्या माणसापासून ते बंगल्यातील माणसापर्यंत सर्वाचे आपल्या आवाजाच्या जादूने मनोरंजन केले. त्यांच्या कार्याची “दखल” यासाठी घ्यावी लागली की, त्यांनी रेडिओ च्या क्षेत्रात जी भरारी घेतली ती जगातील कोणत्याही देशात एक प्रमाण ठरेल. मनोरंजन ही खरेतर सामान्य माणसाची गरज असते. ही गरज भारतीयांसाठी अतिशय रूक्ष असणाऱ्या काळात सयानी यांनी एकहाती सांभाळली.
या क्षेत्रात त्यांनी जी उंची गाठली त्यात भारतातील कोणताही उद्घोषक आजपर्यंत त्यांच्या प्रभावातून बाहेर पडलेला नाही. एखाद्या क्षेत्रात प्रमाण उंची किती गाठावी, याचे प्रमाण अमीन सयानी राहिले. आजचा काळ हा मनोरंजनाच्या पुढचा काळ आहे. दूरचित्रवाहिन्यांवर आक्रस्ताळेपणा करून टीआरपीसाठी शिगेला आवाज नेणाऱ्यांचा हा काळ आहे. या काळात आवाजाच्या नजाकतीला नव्हे, तर, ओरडून-ओरडून प्रश्न विचारणाऱ्यांचा काळ आहे. सयानी यांनी आवाजातील सौंदर्य जोपासले. आज ज्यांना शतकातील चित्रपटांचा महानायक म्हणून संबोधले जाते, त्या अमिताभ बच्चन यांचा आवाज सयानी यांनी रेडिओसाठी नाकारला होता. अर्थात, अमिताभ यांच्या आवाजाचा पोत दम टाकणाऱ्या आवाजाचा आहे. अमीन सयानी यांनी रेडिओसाठी तो आवाज चालणारा नाही, असे ठामपणे म्हटले होते.राजकारण, समाजकारण, अर्थकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातवर आपण रोज लिहीतो आणि वाचतो. त्यात कधी कधी हलका-फुलका बदलही असावा, जेणेकरून वाचकांना थोडा बदलही अनुभवता यावा आणि एखाद्या क्षेत्रात कतृत्वाचे शिखर गाठणाऱ्या व्यवक्तिमत्वाची ‘दखल’ही व्हावी !
COMMENTS