Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देगलूर-बिलोली मतदारसंघात जनतेचा संताप अनावर! वाळू माफिया, वाढती गुंडगिरी आणि निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात सध्या कायद्याचे राज्य आहे की माफियाराज, असा संप्तत सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बेसुमार वाळ

नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अमली पदार्थांविरोधात धडक कारवाई; 80 गुन्हे दाखल, 1.27 कोटींचा मुद्देमाल जप्त
कारवाईचा देखावा की प्रशासनाचे अपयश? नायगावात वाळूमाफियांचा पुन्हा हैदोस
वाळू माफियांना संरक्षण प्रकरणी मोठी कारवाईपरभणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे नांदेड नियंत्रण कक्षात संलग्न

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात सध्या कायद्याचे राज्य आहे की माफियाराज, असा संप्तत सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. बेसुमार वाळू उपसा, दिवसाढवळ्या सुरू असलेले अवैध धंदे, भरधाव धावणाऱ्या विना-पावतीच्या गाड्या आणि प्रशासनाची संशयास्पद शांतता यामुळे सामान्य जनतेचे जगणे अक्षरशः असुरक्षित झाले आहे. या सगळ्या परिस्थितीत मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मात्र पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

बिलोली तालुक्यातून दररोज शेकडो वाळूच्या गाड्या कोणत्याही भीतीशिवाय धावत असल्याचे चित्र आहे. अनेक वाहनांकडे पावत्या नसतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट प्रशासनाच्या आशीर्वादामुळेच हे अवैध साम्राज्य फोफावत असल्याची चर्चा गावागावांत सुरू आहे. भरधाव ट्रक आणि डंपरमुळे सामान्य नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना अक्षरशः किड्या-मुंग्यांसारखे चिरडले जात असून, निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत.

विशेष म्हणजे, याबाबत अनेक वेळा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित प्रशासनाला निवेदने देण्यात आली. फोनद्वारे सूचना देण्यात आल्या. संभाव्य दुर्घटनांबाबत वारंवार इशारे देण्यात आले. मात्र प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. “करोडो रुपये कमवा, पण सामान्य माणसांचा जीव तरी वाचवा,” अशी हतबल भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

अलीकडेच एका शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अशाच अपघातात मृत्यू झाल्याने संताप अधिकच तीव्र झाला आहे. एका कुटुंबाचा आधार हरवला, संसार उघड्यावर पडला; पण या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न आता जनतेसमोर उभा आहे. अवैध वाळू उपशातून तयार झालेल्या आर्थिक साखळीत प्रशासन, स्थानिक राजकारण आणि काही गुंड प्रवृत्तींचे संगनमत असल्याची चर्चा उघडपणे सुरू आहे.

मतदारसंघातील वाढती गुंडगिरी, अवैध धंद्यांचे खुलेआम जाळे, भीतीचे वातावरण आणि कायद्याचा होत असलेला बट्ट्याबोळ यामुळे जनतेचा संयम संपत चालला आहे. निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या प्रश्नांपासून पूर्णपणे दूर गेल्याचा आरोप होत आहे. “जनतेच्या जिवापेक्षा माफियांचे हित महत्त्वाचे झाले आहे का?” असा थेट सवाल आता गावागावांतून विचारला जात आहे. देगलूर-बिलोली मतदारसंघातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अजूनही डोळेझाक केली, तर आगामी काळात जनतेचा उद्रेक आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “जनता आता गप्प बसणार नाही; वेळ आल्यावर जागा दाखवून देईल,” असा इशाराही संतापलेल्या नागरिकांकडून दिला जात आहे.

COMMENTS