बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही रविवार दि.14 जून 2016 रोजी होणा
बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही रविवार दि.14 जून 2016 रोजी होणार आहे. बीड जिल्हा केंद्रावरील एकूण 21 उपकेंद्रावर दोन सत्रात ही परीक्षा पार पडेल. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून एकूण 5 हजार 881 उमेदवार बसले असून, परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सर्व उपकेंद्रांवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
आयोगाच्या नियमांनुसार, उमेदवारांना परीक्षा केंद्रावर मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तसेच अभ्यासाचे साहित्य घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. मात्र, उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना जेवणाचा डबा, अल्पोपहार आणि पाण्याची बॉटल सोबत आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांना केवळ आयोगाने नेमून दिलेले आवश्यक साहित्यच जवळ बाळगता येईल. सर्व उमेदवारांनी परीक्षेला येताना प्रवेशपत्रासोबत स्वतःचे मूळ ओळखपत्र आणि त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे बंधनकारक आहे. यामध्ये आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. उमेदवारांनी सकाळी 09:30 वाजेपूर्वी आपापल्या परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर येणार्या उमेदवारांना कोणत्याही कारणास्तव प्रवेश दिला जाणार नाही, असेही कळविले आहे._

COMMENTS