महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचे नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी उजेडात आली. ही वृद्ध महिला जादू
महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचे नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी उजेडात आली. ही वृद्ध महिला जादूटोणा करते म्हणून तिची ही धिंड काढण्यात आली, तिला मूत्र पाजण्यात आल्याची घटना समोर आली. खरंतर या घटनेवरून ही पुरोगामी महाराष्ट्राचीच धिंड काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता ही घटना 30 डिसेंबर रोजी घडली, त्यानंतर तब्बल 17 दिवसांनंतर या घटनेला वाचा फुटत आहे. वास्तविक पाहता ही संपूर्ण घटना मनस्वी चीड आणणारी आहे. या घटनेतील पीडितेने तब्बल सहा दिवसांनंतर आपल्या मुलांना हा प्रकार सांगितल्यानंतर 6 जानेवारीला तिने मुलांसह पोलिस ठाणे गाठले अन् तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे व्यवस्थाच सडलेली असून, गुन्ह्याची तीव्रता त्यांना अजूनही समजलेली दिसत नाही. त्यामुुळे गुन्हा नोंदवण्यात विलंब, नग्न धिंड काढूनही केवळ मारहाणीचा गुन्हा या बाबी चीड आणणार्या आहेत. त्यानंतर तिच्या दोन्ही मुलांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेत, आईसोबत घडलेली घटना सांगितली. यानंतर खर्या अर्थाने घटनेला वाचा फुटली.
ब्रिटिशांनी राज्य असल्यापासून दोन राज्यात सर्वात आधी प्रबोधनाचे युग सुरू झाले त्या दोन राज्यांमध्ये पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आघाडीवर होती. या दोन्ही राज्यांनी संपूर्ण देशामध्ये प्रबोधनाची चळवळ वाढवण्याचे आणि रूजवण्याचे महत्वाचे काम केले. यामध्ये सतीप्रथा असेल, महाराष्ट्रातील नरबळी प्रथा असेल, विधवा पुनर्विवाहासारखे कायदे करण्यासाठी चळवळ उभारण्यात सर्वात आधी महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारखे राज्य अग्रेसर होते. खरंतर मानवी मूल्यांना तिलांजली देणार्या प्रथा, परंपरांचा त्याग करावा यासाठी अनेक संस्थांनी मोठ्या नेटाने काम केले. मात्र जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा मन खिन्न होते. प्रबोधन चळवळी ज्या महाराष्ट्रात सुरू झाल्या, त्याच राज्यात अशा काळीमा फासणार्या घटना घडत असेल तर आपली वाटचाल ही उलट्या दिशेने सुरू असल्याचे खेदाने म्हणावे लागते. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या रेट्याखेडा गावात एका 77 वर्षीय महिलेने गावात नग्न अवस्थेत धिंड काढली. नंतर तिच्या तोंडाला काळे फासले आहे. पीडित महिला जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून गावातील लोकांनी हे कृत्य केले आहे. ही महिला एकटी राहते. तिचे मुले कामाच्या निमित्ताने बाहेर गावी राहतात. जादूटोण्याच्या संशयावरून तिची गावात धिंड काढत तिच्या तोंडाला काळे फासण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 30 डिसेंबर रोजी रेट्याखेडा गावातील 77 वर्षीय आदिवासी वृद्ध महिला नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता शौचास घराबाहेर पडली. यावेळी शेजारी राहणार्यांनी महिलेवर जादू टोणा केल्याचा आरोप केला. त्यानंतर दोरीने बांधून लोखंडी रॉड गरत करत चटके दिले. तोंडाला काळे फासत मिरचीची धुरी दिली. एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही तर महिलेच्या डोक्यावर गाठोडे देत बेदम मारहाण करत तिची गावातून धिंड काढण्यात आली. हा सर्व प्रकार घडत असताना गावातील लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. यामध्ये पोलिस पाटील धिंडीत उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार किळसवाणाच म्हणावा लागेल. खरंतर शिक्षणाने माणूस प्रगल्भ होतो, असे म्हटले जाते. मात्र ज्या गावातून ही धिंड काढली, त्या गावात सद्सदविवेक बुद्धी असलेला एकही व्यक्ती या घटनेला विरोध करू शकला नाही. विशेष म्हणजे काढण्यात आलेल्या धिंडीत पोलिस पाटील सहभागी असल्याचे म्हटले जात आहे, त्याची पडताळणी पोलिस करतीलच. मात्र ज्या पोलिस पाटलावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असते, त्या पोलिस पाटलांनी ही धिंड रोखायला हवी होती, जर जमाव त्यांचे ऐकत नसेल तर, तात्काळ मोबाईलवरून संबंधित पोलिस ठाण्याला हा प्रकार कळवला असता, तर महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना घडलीच नसती. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा असतांना, ज्या कुणाला शंका होती, त्यांनी पोलिसांकडे धाव घेवून यावर गुन्हा नोंद करता आला असता. मात्र या सर्व बाबी धुडकावत कायदा हातात घेणारेच खरे गुन्हेगार आहेत, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई होण्याची खरी गरज आहे.
COMMENTS