Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

129 गावांतील साडेआठ हजारावर शेतकर्‍यांचे गारपिटीत नुकसान

जिल्ह्यातील 11 तालुक्यांना बसला फटका

अहमदनगर/प्रतिनिधी ः सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सलग तीन दिवस जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचा फटका जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 129 गावांना बसला आहे. या

रेनबो स्कूलचे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत यश
प्रतीक काळेच्या आत्महत्येशी मंत्री गडाखांचा संबंध? ;माजी आ. मुरकुटेंकडून चौकशीची मागणी
मार्केट यार्ड चौकात कोरोनारुपी रावणाचे दहन

अहमदनगर/प्रतिनिधी ः सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सलग तीन दिवस जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचा फटका जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 129 गावांना बसला आहे. या गावांतील सुमारे साडे आठ हजारावर शेतकर्‍यांच्या सुमारे साडेचार हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना आता शासनाच्या मदतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, गारपिटीमध्ये कोणत्या ठिकाणी पिकांचे किती नुकसान झाले, याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे.

कृषी विभागाने मागील आठवड्यात केलेल्या प्राथमिक पंचनामा अहवालात जिल्ह्यातील 9 तालुक्यात झालेल्या गारपिटीत 128 गावांतील 14 हजार 785 शेतकर्‍यांचे 7 हजार 841 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे म्हटले होते. तसेच यात सर्वात जादा नुकसान श्रीरामपूर तालुक्यातील 55 गावातील 6 हजार 981 शेतकर्‍यांचे 3 हजार 975 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचे दाखवण्यात आले होते. आता कृषी विभागाने या नुकसानीचा अंतिम अहवाल केला आहे. त्यानुसार गारपिटीच्या अंतिम अहवालात निम्म्याने घट झाली असून, दोन तालुके वाढले आहेत. तसेच अकोले, शेवगाव, कर्जत वगळता अन्य तालुक्यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले गेले आहे. चालू महिन्यात 15 ते 18 मार्चदरम्यान जिल्ह्यात झालेल्या गारपिटीत 11 तालुक्यातील शेती पिकांना फटका बसला आहे. या गारपिटीत 11 तालुक्यातील 129 गावात 8 हजार 894 शेतकर्‍यांचे 4 हजार 842 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात म्हटले आहे.

कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीत नुकसानीची आकडेवारीसमोर आली आहे. या गारपिटीतून अकोले, शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत आणि पारनेर तालुके बचावले असल्याचे प्राथमिक पंचनामा अहवालात सांगण्यात आले होते. मात्र, अंतिम पंचनामा अहवालात पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अंतिम पंचनामा अहवालात नगर, अकोले, राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डी, जामखेड आणि नेवासा तालुक्यातील 8 हजार 894 शेतकर्‍यांचे 4 हजार 842 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. याबाबतच अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासनाला पाठवला असून या अहवालावर आता जिल्हाधिकारी यांची सही झाल्यावर हा अंतिम होवून राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य सरकारद्वारे मिळणार्‍या नुकसान भरपाईची प्रतीक्षा असणार आहे.

पिके, फळे व फुलांचेही नुकसान – जिल्ह्यात 15 ते 18 मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीत शेतकर्‍यांचे कांदा, टोमॅटो, लिंबू, मका व अन्य भाजीपाला आणि चारा पिके तसेच ऊस, संत्रा, आंबा, डाळींब, चिकू, द्राक्ष अशी फळ पिके, गहू, ज्वारी, हरभरा या धान्य पिकांसह झेंडू या फूल पिकांचेही नुकसान झाले आहे. तीन दिवसांच्या पावसाने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले असल्याने याची नुकसान भरपाई शासनाने तातडीने देण्याची मागणी होत आहे.

COMMENTS