Homeताज्या बातम्या

हातगाडा व्यावसायिकांचा संताप; ’हप्ता द्या, नाहीतर कारवाई’च्या आरोपांनी शहरात खळबळ

नांदेड शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अंमलबजावणीवरून हातगाडा व्यावसायिक आणि व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कारवाईच्या नावाखाली क

अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको; सर्वांवर समान कारवाई करा-रतन गुजर
अतिक्रमण हटाव मोहिमेची हवा; शहरात पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती
भररस्त्यात उमा भारतींनी तळले पोहे-जलेबी! गरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या प्रशासनाविरुद्ध अनोखे आंदोलन



नांदेड शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या अंमलबजावणीवरून हातगाडा व्यावसायिक आणि व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. कारवाईच्या नावाखाली काही अधिकार्‍यांकडून व कर्मचार्‍यांकडून कथित हप्त्याची मागणी होत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला असून, या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या विषयाची चर्चा आता राजकीय पातळीवरही पोहोचली असून, महापालिकेच्या सभागृहातही त्याचे पडसाद उमटले आहेत.
शहरात पाचशेपेक्षा अधिक हातगाडा व्यावसायिक विविध भागांत व्यवसाय करतात. रोजगाराचे इतर पर्याय नसल्याने अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, अपुर्‍या हॉकर्स झोनमुळे त्यांना रस्त्यावर व्यवसाय करावा लागत असून, याच अडचणीचा काही जण गैरफायदा घेत असल्याची चर्चा आहे. व्यावसायिकांचा आरोप आहे की, नियमित हप्ता दिल्यास कारवाई होत नाही; परंतु नकार दिल्यास अतिक्रमण पथक तत्काळ धडक देते. गाडे जप्त करणे, मालाची नासधूस करणे, दंड आकारणे किंवा पोलिसी कारवाईची भीती दाखवणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक भीतीच्या वातावरणात व्यवसाय करत असल्याचे सांगितले जाते. महापालिकेकडून दररोज अधिकृत शुल्क आकारले जात असतानाही अतिरिक्त पैशांची कथित मागणी होत असल्याने व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. व्यापारी संघटनांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय विशेष सभेत सत्ताधारी गटनेत्यांनी प्रशासनातील भ्रष्टाचारावर कठोर शब्दांत टीका केली. विविध विभाग महसूल वाढविण्याऐवजी वसुलीचे साधन बनत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे हा विषय केवळ व्यावसायिकांच्या तक्रारीपुरता मर्यादित न राहता राजकीय चर्चेचाही केंद्रबिंदू ठरला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने या आरोपांवर अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, शहरातील व्यापारी, हातगाडा व्यावसायिक आणि नागरिक आता संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. अतिक्रमण निर्मूलन ही गरज असली तरी त्याच्या नावाखाली जर भ्रष्टाचार होत असेल, तर तो रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याची भावना शहरभर व्यक्त होत आहे.

COMMENTS