कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका

संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला असून, तो सातत्याने घसरत आहे. त्यामुळे विविध राज्यात निर्बंध शिथील करण्यात आले असून, सर्व व्यवहार सुरू झाले

जात पंचायतीचा जाच थांबेना
क्रूर दहशतीचा खात्मा
चीनच्या कुरापती

संपूर्ण भारतात कोरोना रुग्णांचा आलेख घसरला असून, तो सातत्याने घसरत आहे. त्यामुळे विविध राज्यात निर्बंध शिथील करण्यात आले असून, सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. अर्थव्यवस्था रूळावर आली असून, गेल्या काही मह्न्यिात जीएसटी संकलनांच्या आकडयाने देखील मोठा विक्रम नोंदवला असतांना, कोरोनाच्या नवा विषाणू आढळून आल्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. ओमिक्रोन असं या विषाणूचे नाव जागतिक आरोग्य संघटनेने ठेवले आहे. कोरोनाच्या या परिस्थितीमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असून, गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजार कोसळला असून, गुंतवणूकदारांचे कोटयावधीं रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा नवा व्हेरियंट भारतात पसरणार नाही, याची पुरेपूर काळजी घेण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा ओमिक्रोन हा नवा विषाणू सापडल्यानंतर ब्रिटन आणि युरोपीयन संघाने दक्षिण आफ्रिकेतून येणार्‍या विमानांवर निर्बंध घातलेत. त्यामुळे या ओमिक्रोन या विषाणूचे पडसाद जगभरात उमटतांना दिसून येत आहे. याचा प्रभाव जसा रुग्णांवर पडू शकतो, तसाच अर्थव्यवस्थेवर देखील पडू शकतो. कोरोनातून जगभरातील अर्थव्यवस्था सावरतांना दिसून येत आहे. अशा परिस्थिीत हा नवा व्हेरियंट धोकादायक ठरला, तर तो अर्थव्यवस्थेसाठी देखील कर्दनकाळ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सावध होऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील तातडीने बैठक घेत याचा आढावा घेतला. वेगाने पसरणार्‍या नवीन व्हेरीयंटमुळे, भारत सरकारने सर्व राज्यांना दक्षिण आफ्रिका आणि इतर हाई रिस्क देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची जलद चाचणी आणि तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ओमीक्रोन व्हेरीयंट आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना, इस्रायल आणि बेल्जियममध्ये पसरला आहे.
या नव्या विषाणूमध्ये मोठ्या प्रमाणावर म्युटेशन झालेले आढळले आहे. समोर आलेल्या प्राथमिक पुराव्यांचा विचार करता या विषाणूच्या पुनर्संसर्गाचा धोका वाढला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. काळानुसार विषाणूमध्ये म्युटेशन किंवा बदल होणं यात काही नवीन किंवा असामान्य नाही. मात्र, जेव्हा अशा प्रकारच्या म्युटेशनमुळे संसर्गाचे प्रमाण, त्याची घातकता आणि लसीच्या क्षमतेवर परिणाम होत असेल, तेव्हा तो व्हेरिएंट काळजीचे कारण ठरत असतो. आफ्रिकेच्या दक्षिण भागातून आलेल्या प्रवाशांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल आणि या काळात त्यांना 4 वेळा टेस्ट करावी लागेल असं जपानने जाहीर केले. तर दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना आणि हाँगकाँगहून येणार्‍या प्रवाशांची कडक तपासणी आणि चाचण्या कराव्यात असे भारताने जाहीर केल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले. गुजरात राज्य सरकारने युरोप, युके, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, बोट्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि हाँगकाँगहून येणार्‍या प्रवाशांसाठी कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. आफ्रिकेच्या दक्षिण भागातल्या 6 देशांतून येणार्‍या प्रवाशांवर इराणने बंदी घातली आहे. यात दक्षिण आप्रिकेचाही समावेश आहेत. या भागातून येणार्‍या इराणी नागरिकांची दोनदा चाचणी करण्यात येईल. आणि या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना देशात प्रवेश देण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. ओमिक्रॉन वेरिएंट कुठे निर्माण झालाय, हे अद्याप स्पष्ट नाही. पण दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी या नवीन कोरोना वायरस वेरिएंटचा शोध लावला आहे. नंतर, हाँगकाँग आणि बोत्सवाना देशातल्या प्रवाशांमध्येही हा कोरोना वायरस वेरिएंट आढळला. या नवीन वेरिएंटची भारतात आतापर्यंत एकही केस समोर आलेली नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सरकार आवश्यक त्या उपाययोजना करत आहे.

COMMENTS