नितीशकुमारांची विश्‍वासार्हता धोक्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितीशकुमारांची विश्‍वासार्हता धोक्यात

बिहारचे तब्बल सात वेळेस मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि जनता दल संयुक्त या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असलेले नितीशकुमार यांचे सरकार मंगळवारी बिहारमध्ये कोसळले

अवकाळीच्या कळा…
प्रजासत्ताकापुरते प्रजासत्ताक
शिदेंच्या शिवसेनेवर नामुष्की

बिहारचे तब्बल सात वेळेस मुख्यमंत्रीपद भुषवलेले आणि जनता दल संयुक्त या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असलेले नितीशकुमार यांचे सरकार मंगळवारी बिहारमध्ये कोसळले. अर्थात सरकार कोसळण्यामागे निमित्त आहे खुद्द नितीशकुमार. त्यांनी भाजपची साथ सोडत लालु प्रसाद यादव यांचा राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाशी हातमिळविणी करत पुन्हा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. नितीशकुमार आरजेडीसोबत पुन्हा सत्तेत येतील, मात्र यामुळे नितीशकुमारांची यानिमित्ताने विश्‍वासाहर्ता काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. कधी काळी नितीशकुमार यांना पतंप्रधानपदाचे स्वप्न पडायला लागले, त्यामुळे त्यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत फारकत घेत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर आता पुन्हा भाजपला सोडचिठ्ठी देत आरजेडी सोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे समोर आले आहे. एकतर नितीशकुमार यांनी आरजेडीचा देखील यापूर्वीच धोका दिला आहे, आणि आता भाजपला पुन्हा धोका दिला आहे. त्यामुळे सात वेळेस मुख्यमंत्री असलेल्या नितीशकुमार यांची विश्‍वासार्हता बिहारच्या राजकारणांत पणाला लागली आहे. इतक्या वेळेस मुख्यमंंत्री राहून सुद्धा नितीशकुमारांना बिहारचा समतोल विकास साधता आलेला नाही. पहिल्या दोन टप्प्यात त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आणि वाखण्याजोगे होते. मात्र त्यानंतर तिसर्‍यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर नितीशकुमार विराजमान झाल्यानंतर मात्र त्यांची कारकीर्द ढेपाळतांना दिसून आली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार नुकत्याच पार पडलेल्या नीति आयोगाच्या बैठकीला अनुपस्थित होते. मागील एक महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला नितीश कुमार दुसर्‍यांदा गैरहजर राहिले होते. त्यामुळे नितीश कुमार आणि केंद्र सरकारमध्ये मतभेद असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे कोणत्याही क्षणी बिहारमधील सत्ताधारी भाजप – जदयूमधील युती तुटेल, याबाबत तर्क वितर्क लावले जात होते. अखेर नितीश कुमार यांनी भाजपासोबतची युती तोडल्याची घोषणा केली आहे. संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या प्रकरणात, उमेश कुशवाहा यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यानंतर आरसीपी सिंह यांनी संयुक्त जनता दलाचा दिलेला राजीनामा आणि जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांच्याकडून भाजपाचे नाव न घेता होत असेलेले हल्ले याने वातावरण अधिकच तापवलेले आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 तर विधानसभेच्या 243 जागा आहेत. सध्याच्या बिहारच्या विधानसभेचे संख्याबळ पाहिल्यास, त्यात राजद 80, भाजप 77, संयुक्त जनता दल 45, काँग्रेस 19, डावे 16, हम 4. एमआयएम 1 आणि अपक्षांची संख्या 1 आहे. तर लोकसभेचा विचार केल्यास भाजप 17, संयुक्त जनता दल 16 आणि एलजेपी (पशुपती) 5, एलजेपी (चिराग पासवान) 1 आणि काँग्रेसचा 1 खासदार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राजदचा एकही खासदार नाही. अशा परिस्थितीत नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपची साथ सोडत राजदची साथ देत सत्ता स्थापन करण्याच्या मार्गावर आहे. मात्र तब्बल सात वेळी बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले नितीशकुमार यांची प्रतिमा डागाळली आहे. भविष्यात नितीशकुमार तिसर्‍या आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असा दावा करण्यात येत होता. मात्र त्यांच्या विश्‍वासाहतेमुळे त्यांची राष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे. धड भाजपसोबत ही नाही, आणि धड विरोधकांसोबतही नाही. त्यामुळे नितीशकुमारांच्या या निर्णयामुळे पुन्हा ते काही वर्ष फक्त बिहारच्या राजकारणांपुरतेच सीमित राहू नये.

COMMENTS