Homeताज्या बातम्यासंपादकीय

नितीशकुमार संधीसाधू राजकारणी

भविष्यातील राजकारणांची बीजे तुमच्या वर्तमानात रुजलेले असतात. त्यामुळे भविष्यात तुम्हाला राजकारणाची महत्वाकांक्षा असेल, तर तुम्हाला विश्‍वासार्हते

संसदेचा आखाडा
लोकशाहीचा उत्सव आणि मूल्ये
अर्थसंकल्प आणि शेतकरी

भविष्यातील राजकारणांची बीजे तुमच्या वर्तमानात रुजलेले असतात. त्यामुळे भविष्यात तुम्हाला राजकारणाची महत्वाकांक्षा असेल, तर तुम्हाला विश्‍वासार्हतेचे राजकारण करायला हवे. आणि तुम्हाला जर तत्कालीन पद वाचवायचे असेल तर, तुम्हाला तडजोडीचे राजकारण करावे लागते. याचप्रकारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भविष्यातील राजकारणाला तिलांजली देत आपली खूर्ची वाचवण्याला प्राधान्य दिले आहे. वास्तविक पाहता बिहारमधील जातनिहाय जनगणना आणि या जनगणनेच्या आधारे आरक्षणात 15 टक्के वाढ करण्याच्या निर्णयामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढले आहे. मंडल आयोगामुळे माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंह यांची दुर्बल घटकांचे तारणहार किंवा ‘मसिहा’ अशी प्रतिमा निर्माण झाली होती. तशीच नितीशकुमार यांची प्रतिमा तयार होते का? याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असतांना, नितीशकुमार राष्ट्रीय स्तरावर महत्वाचा चेहरा ठरत असतांना भाजपने त्यांचे राजकीय वजन खच्चीकरण केल्याचे दिसून येत आहे.  नितीशकुमार कधी भाजप तर कधी लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर हातमिळवणी करण्याच्या धरसोड वृत्तीमुळे नितीशकुमार यांची प्रतिमा संधीसाधू राजकारणी अशी झाली होती. याशिवाय त्यांचे राजकीय महत्त्वही कमी होत गेले होते. वास्तविक पंतप्रधान मोदी यांना पर्याय म्हणून नितीशकुमार यांचे नाव घेतले जात असे. पण मध्येच भाजपशी हातमिळवणी केल्याने नितीशकुमार यांच्या प्रतिमेला फटका बसला. भाजपला सोडून नितीशकुमार यांनी पुन्हा लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्यानंतर पुन्हा भाजपसोबत घरोबा नितीशकुमारांनी केला आहे. त्यामुळे नितीशकुमारांचे राष्ट्रीय राजकारण जवळ-जवळ संपुष्टात येतांना दिसून येत आहे. खरंतर नितीशकुमारांच्या खुर्चीला तसा धोका नव्हता, मात्र भाजप भविष्यात नितीशकुमारांसमोर नवे आव्हान उभे करणार होता, यात शंका नाही. मात्र वादळ येण्याआधीच नितीशकुमार सावध भूमिकेत जाऊन भाजपसोबत गेले. त्यामुळे इंडिया आघाडीतील एक महत्वाचा चेहरा कमी झाला आहे. परिणामी इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीत फार मोठा करिश्मा दाखवेल, असे काही नाही. वास्तविक पाहता नितीशकुमार इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. असे असतांना नितीशकुमारांनी आपल्या पायावर धोंडा पाडून भविष्यातील राजकारणाला खो घातल्याचे दिसून येत आहे. बिहारचे राजकारण नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाशी फिरतांना दिसून येते. या राज्यात भाजप अजूनही पाय पसरू शकलेले नाही. त्यामुळे भाजप आपले पाय पसरवण्यासाठी तेथील पक्षांशी हातमिळवणी करून भविष्यातील राजकारणांची बीजे रोवतांना दिसून येत आहे. खरंतर अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाजपने आपली प्रतिमा पुन्हा एकदा उजळून घेतली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका भाजपला जिंकणे अवघड नाही. त्यासोबतच इंडिया आघाडीचे शकले होतांना दिसून येत आहे. ममता बॅनजी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. उत्तरप्रदेशात मायावती यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. अशा परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीतील नितीशकुमारचा जेडीयू भाजपसोबत गेल्यामुळे इंडिया आघाडीतील बरीचशी हवा निघून जातांना दिसून येत आहे. असे असले तरी, सत्ता आज आहे, उद्या नाही, मात्र राजकारणातील विश्‍वास महत्वाचा असतो, तोच नितीशकुमारांनी तोडला आहे. त्यांनी 9 व्या वेळेस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे नितीशकुमार किती दिवस भाजपसोबत राहतील ती देखील शंकाच आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नितीशकुमार वेगळा स्टँड घेवू शकतात, तसे संकेत बिहारचे चाणक्य प्रशांत किशोर यांनी दिले आहेत. त्यामुळे संधीसाधू राजकारणी, पलटूराम, अशी प्रतिमा नितीशकुमारांची होत असतांना, ती प्रतिमा नितीशकुमार पुसण्यात यशस्वी होतात की, हीच प्रतिमा घेवून पुढील राजकारण करतात, ते पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.  

COMMENTS