Homeताज्या बातम्यासंपादकीय

अमलीपदार्थांचा वाढता वापर

देशामध्ये सध्या नाताळचा उत्सवाची धामधुम सुरू असतांनाच दुसरीकडे नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी आतापासूनच जय्यत तयारी केली आहे. यासोबतच नववर

आता हमीभावासाठी शेतकर्‍यांचा लढा
महायुतीमध्ये जागावाटपावरून ठिणगी
ठाकरे गटाची सोयीची भूमिका

देशामध्ये सध्या नाताळचा उत्सवाची धामधुम सुरू असतांनाच दुसरीकडे नववर्षांचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी आतापासूनच जय्यत तयारी केली आहे. यासोबतच नववर्षांच्या पूर्वसंध्येला होणार्‍या रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर असली तरी, यानिमित्ताने होणार्‍या अमलीपदार्थांची विक्री चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून रेव्ह पार्ट्यांव्यक्तीरिक्त सुद्धा इतर दिवशी अमली पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात ललित पाटीलच्या माध्यमातून ड्रग्जचे जाळे कुठपर्यंत पोहचले होते, याचा अंदाज येतो. कधीकाळी मुंबई आणि पुण्यासारख्या आणि इतर शहरांमध्ये केवळ उच्चभू्र सोसायट्यांमध्ये या अमली पदार्थांची विक्री होत होती, ती आता मध्यमवर्गींयापर्यंत येऊन पोहचली आहे. त्यामुळे अमलीपदार्थांचा वापर चिंताजनक असून, अमलपदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे. खरंतर ललित पाटील सारखे ड्रग्जमाफिया केवळ राजकीय नेत्यांचा वरदहस्त आणि पोलिसांच्या वरदहस्तामुळे पोसू शकत नाही. मुंबई पोलिसांनी या वर्षभरात सुमारे साडेचारशे कोटींचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्यातही चारशे कोटींचे मेफड्रेन म्हणजे एमडी जप्त केले आहे. यासोबतच मुंबई पोलिसांनी वर्षभरात 800 कोटींचे अमलीपदार्थ नष्ट केले आहे. त्यामुळे यावरून या अमलीपदार्थांची व्याप्ती स्पष्ट होते. अमली पदार्थांच्या सेवनाने  माणसाला विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा, तार किंवा धुंदी येते. त्यांना रुढार्थाने मादक पदार्थ किंवा अमली पदार्थ म्हणतात. अफू व त्यापासून तयार केलेले मॉर्फीन, हेरॉईन इ. पदार्थ, कोकेन, भांग, गांजा, चरस वगैरे पदार्थाचा मादक पदार्थात समावेश केला जातो. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. यापुढेही जाऊन श्रीमंत लोक सिंथेटीक अमली पदार्थ आणि आता घातक जीवघेणा एमडीचा अर्थात मेफेड्रॉन वापर होऊ लागला आहे. 2023 मध्ये 1319 गुन्ह्यांमध्ये एकूण 437 कोटी 98 लाखांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. त्या प्रकरणी 1718 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी वर्षभर कारवाई करून साडेसात कोटी रुपयांचा गांजा, 50 लाखांचे कोकेन, 10 कोटींचे चरस, चार कोटी 21 लाखांचे हेरॉईन, 58 लाखांचे एलएसडी पोलिसांनी जप्त केले आहे. भारतात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार अमली पदार्थ वापरणे गुन्हा आहे. ड्रग्ज तुम्ही तुमच्यासाठी वापरा किंवा दुसर्‍या कामासाठी वापरा, तो गुन्हाच आहे. त्याला दंड हा ड्रग्स किती प्रमाणात वापरतो याच्यावर अवलंबून असते. जर एखाद्याला ड्रग्स बाळगण्यासाठी किंवा सेवन केल्यामुळे शिक्षा झाली असेल आणि त्याची सुधारायची इच्छा असेल तर तो एखाद्या डी-ऑडिक्शन सेंटरमध्ये उपचार घेऊ शकतो. त्याने उपचार मध्येच थांबवले आणि परत व्यसनाकडे वळाला तर त्याला परत शिक्षा होऊ शकते. एकेकाळी केवळ शहरापुरते मर्यादित असलेले अमली पदार्थांचे सेवन आता ग्रामीण भागात देखील येवून पोहचले आहे. केवळ जिज्ञासेपोटी अमली पदार्थांची चव चाखणारे आज या गर्तेत आपोआपच सापडले जात आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच उच्चभ्रू वर्गातील लोकही यात गुरफटू लागले आहेत. सुरुवातीला कोणीही अमली पदार्थ व्यसनाधीन होण्यासाठी सेवन करीत नाही. काही विद्यार्थी अभ्यास करताना झोप येऊ नये म्हणून सुरुवातीला अमली पदार्थाचे सेवन करतात. मुलीही अमली पदार्थाच्या विळख्यात अडकू लागल्या आहेत. बाजारात नशा आणणारे अनेक पदार्थ मिळतात. काही औषधांनीही नशा येते. काहीजण अमली पदार्थ शरीरात टोचून घेतात, पण कोणताही अमली पदार्थ हा शरीरासाठी घातकच आहे. असे असतांना देखील त्याचा वापर सर्रास केला जात आहे. वास्तविक पाहता बॉलीवूड, नामांकित शिक्षणसंस्था, यातील तरूण-तरूणी सर्रास या ड्रग्जचा वापर करतांना दिसून येत आहे. त्यामुळे या अमलीपदार्थांवर अटकाव घालणे काळाची गरज आहे.

COMMENTS