पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने महिला आणि युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदांच्या निय
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने महिला आणि युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या नियुक्त्यांनुसार वैशाली नागवडे यांच्याकडे महिला प्रदेशाध्यक्षपदाची, तर निखिल ठाकरे यांच्याकडे युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महिला आणि युवक संघटनांना सक्षम नेतृत्व मिळाल्याने राज्यभर पक्ष विस्ताराच्या कामाला अधिक गति मिळेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तळागाळातील संघटना अधिक बळकट करणे, नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे आणि विविध स्तरांवर पक्षाची उपस्थिती वाढवणे, या उद्देशाने या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर वैशाली नागवडे यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्यातील महिला कार्यकर्त्यांना एकत्रित करून पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे त्यांनी सांगितले. महिला सबलीकरण, त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे आणि महिला संघटना अधिक सक्षम करणे यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS